दीक्षाने वडिलांच्या अंत्ययात्रेत हातात धरले शितळ अन् दिला चितेला भडाग्नी 

नागेश गायकवाड 
Sunday, 7 February 2021

वडिलांच्या मृतदेहाला मुलानेच अग्नी देण्याची परंपरा आहे. मुलगा नसेल तर भाऊ, त्याचा मुलगा किंवा इतर मुलांकडूनच भडाग्नी दिला जातो.

आटपाडी (सांगली) : वडिलांच्या मृतदेहाला मुलानेच अग्नी देण्याची परंपरा आहे. मुलगा नसेल तर भाऊ, त्याचा मुलगा किंवा इतर मुलांकडूनच भडाग्नी दिला जातो. यामुळे अनेक ठिकाणी मुलगा नसलेल्या कुटुंबीयांना विचित्र प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे. अशावेळी त्या कुटुंबाला अडचणीत पकडून भडाग्नी देण्याच्या बदल्यात शेतजमीन किंवा इतर जागा द्यावी लागत होती. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून, त्याला विरोध करणाऱ्याला समाज विरोध करायचा. काल सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील 14 वर्षीय मुलगीने वडिलांच्या चितेला अग्नी दिला आहे.

आटपाडीतील आनंदा जाधव  शेती करत होते. त्यांना सख्खा भाऊ किंवा चुलत भाऊही नाही. काल दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. ते जाग्यावरच कोसळले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांचे निधन झाले. यामुळे पत्नी आणि मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक जण त्यांना धीर देत होते. जेव्हा अंत्यविधीचा प्रश्न समोर आला तेव्हा कोणाच्या हस्ते द्यायचा हा प्रश्न सर्वांच्या समोरच निर्माण झाला. 

आटपाडीतील आनंदा नाथा जाधव (वय 42) यांचे काल दुपारी हृदय विकाराने अचानक निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर डोंगर कोसळला. त्यात त्यांना एकच मुलगी. त्यामुळे चितेला अग्नी देण्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेऊन 14 वर्षीय मुलगी दीक्षा हिला धीर दिला आणि तिनेही आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड देत वडिलांच्या चितेला अग्नी दिला. 

हेही वाचा- अहमदाबाद विमानसेवेला मिळाला  ग्रीन सिग्नल ;  महिनाअखेरीस तिरुपती सेवाही सुरळीत

यावेळी भारत जाधव यांच्या सहकार्याने माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन दीक्षाला त्यासाठी तयार केले. तिला धीर दिला. मनोबल वाढवले. त्यानंतर स्वतः दीक्षा अग्नि देण्यास तयार झाली. स्वतः दीक्षाने वडिलांच्या अंत्ययात्रेत हातामध्ये शितळ धरले. चितेभवती फेरी काढून भडाग्नी दिला आणि आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. रक्षाविसर्जनाचे विधीही तिच्या हस्ते केले जाणार आहेत.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 year old girl father death sangli marathi news