जनावरांच्या बाजारातील 15 कोटींची उलाढाल ठप्प 

ऋषीकेश राऊत
Tuesday, 26 May 2020

वडगाव बाजार समितीतील पश्‍चिम महाराष्ट्रातील जनावरांचा सर्वात मोठा बाजार कोरोनामुळे दोन महिने बंदच आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला 2 हजार जनावरांच्या खरेदी विक्रीतून होणारी सुमारे 15 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने बाजार बंदमुळे बळिराजाला शेती कामासाठी बैलजोडीचा शोध घ्यावा लागत आहे. 

इचलकरंजी : वडगाव बाजार समितीतील पश्‍चिम महाराष्ट्रातील जनावरांचा सर्वात मोठा बाजार कोरोनामुळे दोन महिने बंदच आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला 2 हजार जनावरांच्या खरेदी विक्रीतून होणारी सुमारे 15 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने बाजार बंदमुळे बळिराजाला शेती कामासाठी बैलजोडीचा शोध घ्यावा लागत आहे. 

लॉकडाउन सुरू झाल्याने बाजार समितीतील भाजीपाला सौदे यांसह जनावरांचा बाजारही ओस पडला आहे. दोन महिने उलटले तरी वडगाव बाजार समितीतील जनावरांची खरेदी विक्री बंदच आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जनावरांची मोठी उलाढाल या बाजारात होते. प्रत्येक आठवड्याला वडगाव येथे सोमवारी तर शुक्रवारी इचलकरंजीला जनावरांचा बाजार भरायचा.

2 हजार गायी म्हशी बैलांची तर 700 ते 800 शेळ्या मेंढ्यांची खरेदी विक्री होत असे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून बाजारातून होणारी सुमारे 15 कोटींची उलाढाल थांबली आहे. वडगाव बाजारात जनावरांच्या बाजाराच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यातूनही शेतकरी येण्याचा थांबला आहे. 

बाजार सुरू करण्याच्या हालचाली? 
पणन संचालनालयाने जनावरांचा बाजार सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. पण बाजार समित्यांना बाजार आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली सुरू करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बाजार पूर्ववत सुरू करण्याबाबत वडगाव बाजार समितीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

परवानगी मिळणे गरजेचे
खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या बाजार बंदमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याबरोबर अत्यावश्‍यक व कृषी आधारित साधन म्हणून जनावरांचा बाजार भरण्यासाठी तातडीने परवानगी मिळणे गरजेचे आहे. परवानगी मिळाल्यास बाजारात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. 
-आनंदराव पाटील, सचिव, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Crore Turnover Stop In Livestock Market Kolhapur Marathi news