गडहिंग्लजला हॉटस्पॉट क्षेत्रातील 192 जण कोरोनामुक्त

अजित माद्याळे
Wednesday, 23 September 2020

गडहिंग्लज तालुक्‍यातील 89 पैकी 36 गावे आणि शहरातील दोन ठिकाणांचा हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट आहे. आरोग्य सेतू ऍपद्वारे हॉटस्पॉटची ठिकाणे निश्‍चित झाली असून तेथे तालुक्‍यातील एकूण रूग्ण संख्येच्या तुलनेत 27 टक्के रूग्ण आढळले आहेत

गडहिंग्लज : तालुक्‍यातील 89 पैकी 36 गावे आणि शहरातील दोन ठिकाणांचा हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट आहे. आरोग्य सेतू ऍपद्वारे हॉटस्पॉटची ठिकाणे निश्‍चित झाली असून तेथे तालुक्‍यातील एकूण रूग्ण संख्येच्या तुलनेत 27 टक्के रूग्ण आढळले आहेत. मृत्यूचे प्रमाणही 27 टक्‍क्‍यांवर असून आतापर्यंत 192 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. यावरून हॉटस्पॉटमधील गावांमध्ये नागरिकांनी गांभीर्याने खबरदारी घेण्याची गरज असून प्रशासनाकडून याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना गतीने सुरू झाले आहेत.

गडहिंग्लज शहरासह तालुक्‍यात रोज सरासरी 25 ते 30 रूग्णांचा आलेख आहे. तालुक्‍यातील 70 हून अधिक गावात कोरोना पोहचला असून बाधितांची संख्या 1129 वर पोहचली आहे. आतापर्यंत 695 जणांना डिस्चार्ज दिला आहे. 59 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आरोग्य सेतू ऍपद्वारे हॉटस्पॉटमध्ये दुंडगे, हनिमनाळ, भडगाव, चन्नेकुप्पी, गिजवणे, वडरगे, महागाव, कळवीकट्टे, करंबळी, नेसरी, इंचनाळ, हेब्बाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, बसर्गे बुद्रुक, हलकर्णी, सांबरे, तेरणी, नांगनूर, नूल, मुत्नाळ, हडलगे, हिटणी, कानडेवाडी, खणदाळ, मांगनूर तर्फ सावतवाडी, नौकूड, कडगाव, हरळी बुद्रुक, औरनाळ, जरळी, लिंगनूर कसबा नूल ही गावे, तर शहरातील शिवाजी चौक आणि टिळक पथ परिसराचा समावेश आहे. यातील 12 गावांमध्ये रूग्णसंख्या दोन अंकी आहे. 

हॉटस्पॉटमधील गावांमध्ये प्रशासनाकडून तपासणी मोहिम गतीने करण्यात आली. लक्षणे असणाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले. फवारणी केली. इतर आजाराच्या ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले. सध्या शासनातर्फे प्रत्येक गावात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम सुरू झाली आहे. हॉटस्पॉटमधील गावांमध्ये ही मोहिम प्राधान्याने घेतली. वॉरपुटींगवर "घर टू घर' जावून नागरिकांची तपासणी केली आहे. यातून लक्षणे असणाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. 

कोरोनामुक्त गावेही हॉटस्पॉटमध्ये 
तालुक्‍यातील हसूरचंपू, कडलगे, येणेचवंडी, निलजी या चार गावे अजूनही कोरोनामुक्त आहेत. परंतु, ही गावे सुद्धा आरोग्य सेतू ऍपमधून हॉटस्पॉट म्हणून निश्‍चित झाली आहेत. याबाबत गावकरी मात्र संभ्रमात असल्याचे चित्र आहे. 

ईली-सारीचे 470 रूग्ण 
या हॉटस्पॉट गावांमध्ये माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत प्रत्येक नागरिकाची तपासणी मोहिम झाली. यातून ईली व सारीची (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी) लक्षणे असणारे 470 रूग्णांचा आढळ झाला आहे. त्यातील 75 जणांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले असून केवळ 7 जण कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सांगितले. 

हॉटस्पॉटमधील रूग्णांचा आलेख... 
- गावे : 36 
- एकूण कोरोना रूग्ण : 308 
- एकूण कोरोनामुक्त : 192 
- उपचाराखालील रूग्ण : 100 
- मृतांची संख्या : 16 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 192 Corona-Free In Gadhinglaj Taluka Hotspot Area Kolhapur Marathi News