मिरज - पंढरपूर मार्गावरील 40 फूटी मारुती मूर्तीचे स्थलांतर

प्रमोद जेरे
Wednesday, 18 November 2020

नव्याने सुरू असलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामात या मूर्तीला स्थलांतरित करावे लागणार असल्याचे निश्‍चित झाले

मिरज : मिरज - पंढरपूर रस्त्यावर सिद्धेवाडीनजीक प्रवाशांचे लक्ष वेधणारी महाकाय मारुतीची मूर्ती बऱ्याच आतील बाजूस स्थलांतरीत होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आकर्षण बनलेली महाकाय मारुतीची मुर्ती मंगळवारी नव्या महामार्गाच्या कामासाठी स्थलांतरित करण्यात आली. 

सुमारे शंभर मजूर, चार मोठी जेसीबी मशीन सलग आठरा तास राबत होती. 

रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्यावर सिद्धेवाडीनजीक मिरजेचे प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी त्यांच्या शेतामध्ये या महाकाय मारुतीची उभारणी केली होतील. २००० ला या महाकाय मारुतीची स्थापना करण्यात आली. सुमारे 40 फूट उंची आणि 15 टन वजन असलेली ही महाकाय मारुती मूर्ती या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष आकर्षण बनली. अनेक प्रवासी गाड्या थांबवून या मारुतीचे दर्शन घेऊन पुढे जात असत. यासाठी कोणत्याही प्रकारची पैसे अथवा फी गुजर कुटुंबीयांकडून घेतली जात नसे. केवळ शिल्पकलेचा एक भव्य आविष्कार म्हणून विजय गुजर यांनी ही कलाकृती बनवली आहे. 

नव्याने सुरू असलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामात या मूर्तीला स्थलांतरित करावे लागणार असल्याचे निश्‍चित झाले. मूर्ती वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न गुजर कुटुंबीयांनी केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही मूर्ती अन्यत्र हलविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आज ही मूर्ती हलवण्याचे काम सकाळी लवकर सुरू झाले. त्यासाठी शेकडो मजूर आणि चार मोठ्या जेसीबी मशीन मागवण्यात आल्या तरीही सायंकाळपर्यंत ही मूर्ती ती जागची हलली नाही. रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती हलवण्याचे काम सुरू होते. 

हे पण वाचा - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य  

कष्टाने बनवलेली महाकाय मारुती मूर्ती हलवताना वेदना होत आहेत. कलेचा विचार करून मार्ग वळवता आला असता. महामार्ग अधिकाऱ्यांनी सहकार्य केले असते तर ही मूर्ती वाचली असती. सरकारी यंत्रणेसमोर नाईलाज झाला. जड अंतःकरणाने मूर्ती स्थलांतरीत करीत आहे.

- विजय गुजर,  शिल्पकार

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 foot Maruti idol was shifted elsewhere on Miraj Pandharpur road