esakal | अनुभवलेल्या प्रसंगवर्णनातून साकारले पुस्तक, चंदगडमधील 42 विद्यार्थी बनले लेखक...!
sakal

बोलून बातमी शोधा

42 Students From Chandgad Became Writers ...! Kolhapur Marathi News

गृहपाठ म्हटले की मुले तोंड फिरवतात; परंतु त्यांनी अनुभवलेला प्रसंग लिहा, असे म्हटले तर चेहऱ्यावर उत्साह संचारतो. अध्यापक संजय साबळे यांनी गतवर्षी विद्यार्थ्यांना असे लेखन करण्यास सांगितले.

अनुभवलेल्या प्रसंगवर्णनातून साकारले पुस्तक, चंदगडमधील 42 विद्यार्थी बनले लेखक...!

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : विद्यार्थीदशेमध्ये पुस्तक आणि त्यातील लेखक खूप हवेहवेसे वाटतात. एखाद्या लेखकाचा अनुभव आपल्या अवतीभवती, परिसरात, घरात घडल्यासारखे वाटते आणि तो आणखी जवळचा वाटू लागतो. आपणही असे लिहू शकू का? असा विचार मनात येतो; परंतु त्याला पुस्तकाचे स्वरुप येणार नाही हे गृहीत धरुन तो प्रयत्न थांबतो. येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना मात्र अशी संधी दिली गेली. प्रत्येकाने आपल्याला आलेले अनुभव कागदावर उतरवले आणि नुकतेच ते पुस्तकात रूपांतरित झाले. "आठवणींच्या हिंदोळ्यावर' या शीर्षकाने हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 

गृहपाठ म्हटले की मुले तोंड फिरवतात; परंतु त्यांनी अनुभवलेला प्रसंग लिहा, असे म्हटले तर चेहऱ्यावर उत्साह संचारतो. अध्यापक संजय साबळे यांनी गतवर्षी विद्यार्थ्यांना असे लेखन करण्यास सांगितले. त्यातून कथा, गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितगद्य यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारे साहित्य तयार झाले. 136 पानांच्या या पुस्तकात सातवी ते दहावीच्या 42 विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी मांडल्या आहेत.

सानिका जांभळेने मांडलेला महापुरातील आनंद जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवतो. ऋषीकेश कुंभीरकर हा विद्यार्थी चक्कर येऊन पडतो आणि त्याच्या आईची घालमेल त्याने "आई- मायेचा सागर' या लेखातून मांडली आहे. लग्नाला आलेल्या वऱ्हाडींच्या गर्दीत हरवलेली सिद्धी नीळकंठ, पृथ्वीराज जुवेकरचा जखमी मांजरावरील लेख, स्नेहा प्रभळकरने खोडकर सवयी आणि त्यातून झालेली फजिती व्यक्त केली आहे.

दिग्विजय दळवीच्या हातून झाडांचे नुकसान होते आणि त्यानंतर त्याला झालेला पश्‍चात्ताप व्यक्त केला आहे. क्रिकेटर, पाऊस, सिनेमाचं वेड, आठवणीतील सहल, डायरी लिहिण्याची सवय, रम्य पहाटेचे चित्रण अशा लेखांचा पुस्तकात समावेश आहे. शैक्षणिक परिघात हे पुस्तक चर्चेचे आणि कौतुकाचे ठरले आहे. मुख्याध्यापक व्ही. जी. तुपारे यांचे सहकार्य लाभले. 

सकारात्मक प्रयोग यशस्वी होतात
विद्यार्थ्यांना उपदेशापेक्षा मित्रत्वाच्या पातळीवरचा संवाद आवडतो. एकदा तुम्ही त्यांच्या अंतरंगात शिरलात की विद्यार्थी आणि शिक्षक हे मित्रत्वाचे नाते तयार होते. त्यातून अनेक सकारात्मक प्रयोग यशस्वी होतात. हे पुस्तक त्याचेच द्योतक आहे. 
- संजय साबळे, पुस्तकाचे संपादक 

संपादन - सचिन चराटी