गडहिंग्लजला बेकायदा बांधकामांबाबत कार्यवाही लवकरच

Action On Illegal Construction Of Gadhinglaj Soon Kolhapur Marathi News
Action On Illegal Construction Of Gadhinglaj Soon Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शहरातील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली असून लवकरच याची कार्यवाही सुरू होईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या पालिका सभेत दिली. विरोधी पक्षनेते हारूण सय्यद यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर त्यांनी ही ग्वाही दिली. तसेच आरोग्य सेवेकडे अधिकाऱ्यांनी फॉरमॅलिटी म्हणून पाहू नये, अशी सूचना नगरसेवक महेश कोरी यांनी केली. नगराध्यक्षा कोरी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

विरोधी पक्षनेते सय्यद यांनी सभेच्या सुरूवातीलाच शहरातील बेकायदा बांधकामसंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला. यापूर्वीच्या सभेत हा विषय चर्चेला आला. त्यावेळी नोटीसा लागू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु अद्याप एकाही बेकायदा बांधकाम केलेल्यांना नोटीसा लागू झालेल्या नाहीत. शहरातील अंतर्गत भागात अनेक ठिकाणी अपार्टमेंट व बंगल्यांची कामे होत आहेत.

पार्कींगची जागा न सोडताच बांधकाम झाले आहेत. यामुळे वाहने रस्त्यावर लागत आहेत. एखाद्या आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन, रूग्णवाहिकाही जावू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करून स्वत:च्या जागेत वाहन पार्कींगची सूचना करावी, अशी मागणी सय्यद यांनी केली. त्यावर कोरी यांनी तातडीने यावर कार्यवाही करत असल्याची ग्वाही दिली. तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. 

वाढीव हद्दीतील मेटाचा मार्ग, धबधबा मार्ग, शेंद्री रोड या भागासह शहरातील इराणी वसाहतीत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या विषयांना सभेने मंजूरी दिली. या वेळी नगरसेवक महेश कोरी म्हणाले, ""नागरिकांच्या दृष्टीने आरोग्य सेवा महत्वाची आहे. अधिकाऱ्यांनी आता कारणे सांगू नयेत. कोणत्याही परिस्थितीत मंजूर कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत.

बांधकामासाठी कोणत्याही अडचणी आल्यास आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मदत करू. परंतु अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवेकडे फॉरमॅलिटी म्हणून पाहू नये. आरोग्य सेवेचे गांभीर्य ओळखून काम करावे. शौचालय बांधकामात कोणतीही हयगय चालणार नाही याची नोंद घ्यावी.'' 

या वेळी नगरपालिकेने उभारलेल्या अत्याधुनिक व्यायाम शाळेसाठी दोन प्रशिक्षक मक्ता पद्धतीने घेण्यास सभागृहाने मंजूरी दिली. पालिकेकडे असलेल्या दोन जुन्या वाहनांचा लिलाव करण्यास मान्यता देण्यासह आरोग्य विभागासाठी नव्याने मैला उपसा टॅंकर वाहन खरेदी करण्यासही मंजूरी देण्यात आली. विविध विभागाकडे मक्ता पद्धतीने मनुष्यबळ घेण्याचा विषयही सभेत मंजूर झाला. आगामी शैक्षणिक वर्षासाठी पालिका शिक्षण मंडळाच्या सहा शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक शाळांना विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय झाला.

यासाठी अर्थसंकल्पात दहा लाखाची तरतूद केली आहे. नगरसेवक राजेश बोरगावे यांच्यासह नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, नगरसेवक आणि मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर सभेला उपस्थित होते. 

चार ठिकाणी हायमास्ट दिवे 
खासदार संजय मंडलिक यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून शहरात चार हायमास्ट दिव्यांचे प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. चर्च रोडवरील भगवा चौक, नदीवेस, नेहरू चौक आणि शेंद्री रोडवरील बिरदेव मंदिराजवळ हायमास्ट दिवे बसविण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्येकी दीड लाखाचा खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन समितीकडे प्रशासकीय मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्यास सभागृहाने मंजूरी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com