स्वातंत्र्य सैनिकाच्या उत्तरकार्यासाठी धावले प्रशासन

The Administration Assisted In The Funeral Of The Freedom Fighter Kolhapur Marathi News
The Administration Assisted In The Funeral Of The Freedom Fighter Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : गोवा मुक्ती संग्रामात झोकून दिलेल्या निराधार स्वातंत्र्य सैनिकाच्या वैकुंठाच्या प्रवासात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारसदाराची भूमिका बजावली. स्वातंत्र्य सैनिक किसन विनायक उगले (वय 86) यांच्या मृत्यूनंतर सांगली सिव्हिलमधून मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्यावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे अंत्यसंस्कार करून महसूल विभागाने त्यांच्याप्रती आत्मीयता दाखवून दिली आहे. 

जयसिंगपूर शहराजवळील संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे स्व. उगले अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. शासनाने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पेन्शन लागू केली होती. यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सांगली सिव्हीलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्‍चात कुटुंबिय नसल्याची बाब नायब तहसिलदार संजय काटकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ माहिती घेत सांगली सिव्हीलमधून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. 

शिरोळच्या तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनीही स्व. उगले यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठबळ दिले. मंडल अधिकारी अविनाश सुर्यवंशी, जयसिंगपूरचे तलाठी अमोल जाधव, बाळू चव्हाण, अजय कांबळे आदींनी मृतदेह ताब्यात घेऊन स्व. उगले यांची अखेरची इच्छा म्हणून त्यांच्यावर नृसिंहवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसिलादार पी. जी. पाटील, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी बबन पाटील, कोतवाल सचिन गतारे यांच्यासह नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी मोठे योगदान दिले. उतरत्या वयात त्यांनी शहरानजीक संभाजीपूरमध्ये वास्तव्य केले. पेन्शनवरच त्यांचा औषधाचा खर्च आणि उदरनिर्वाह सुरु होता. त्यांच्या मृत्युनंतर निराधार म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ न देता तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, मंडल अधिकारी अविनाश सुर्यवंशी, जयसिंगपूरचे तलाठी अमोल जाधव यांच्या प्रयत्नातून त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

समाधानाची भावना
गोवा मुक्ती संग्रामातील स्व. किसन उगले यांनी आपल्या मृत्युनंतर आपल्यावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा काही जणांकडे व्यक्त केली होती. ही बाब समजल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वारसदारांची भूमिका घेत त्यांच्यावर नृसिंहवाडीत अंत्यसंस्कार केले. स्वातंत्र्य सैनिक स्व. उगले यांच्या मृत्युपश्‍चात त्यांना निराधार म्हणून अंत्यसंस्कार केले नाहीत ही बाब खूपच समाधानाची असून यामध्ये नायब तहसिलदार संजय काटकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. 
- डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसिलदार, शिरोळ 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com