
गडहिंग्लज : कोरोनाने जनजीवन विस्कळितच केले नाही तर जगण्याचे संदर्भही बदलून टाकले आहेत. जिवाच्या भीतीने अनेक चाकरमान्यांनी आपले मूळ गाव गाठले. अडीच-तीन महिन्यानंतरही पुण्या-मुंबईतील कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही. अशा परिस्थितीत पुन्हा परत जाणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे गड्या आपला गावच बरा, असे म्हणत अनेक जण कायमस्वरुपी गावीच थांबण्याच्या मन:स्थितीत आहेत. शेतीसह अन्य छोट्या-मोठ्या नोकरी, व्यवसायाचा आधार त्यांच्याकडून शोधला जात आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुणे, मुंबई या शहरात सुरवातीला झाला. हळूहळू संसर्ग वाढू लागला. तसे नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत असणाऱ्यांनी गावचा रस्ता धरला. लोंढेच्या लोंढे गावाकडे येऊ लागले. 30 मार्चपर्यंतच जिल्ह्यात सुमारे 70 हजार लोक परजिल्ह्यातून आले. तर त्यानंतरही महिनाभरात 25 हजार लोकांनी गाव गाठले आहे. आता येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णत: थांबलेले नाही. नोकरी-व्यवसाय आहे तसा टाकून हे लोक आले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसला तरी व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात आलेल्यांना पुन्हा नोकरीवर हजर होण्यास सांगितले जात आहेत.
पण, एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना पुन्हा पुणे, मुंबईला जायचेच कशाला असा विचार करणाराही एक वर्ग आहे. गावीच थांबून काही तरी करता येईल, अशी त्यांची मानसिकता दिसत आहे. घरची असणारी शेती कसता येईल. त्याच्या जोडीला दुग्ध व्यवसाय करता येईल असा त्यांचा विचार सुरू आहे. घरचे पहात छोटा-मोठा नोकरी, व्यवसाय करता येईल का, याच्या शोधातही अनेक जण असल्याचेही दिसून येत आहे. मुंबईत नोकरी करताना तुटपुंजा पगार असणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. आधीच कमी पगारात भागविणे मुश्किल होते. त्यात आता जीव धोक्यात घालून कशाला जायचे, अशी त्यांची मानसिकता आहे.
पेरणीला मिळाले मनुष्यबळ...
मार्चच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पुण्या-मुंबईहून परतणाऱ्याची संख्या मोठी आहे. तर त्यानंतरही अनेकांनी गाव गाठले आहे. या सर्वांचा क्वारंटाइनचा कालावधी कधीच संपला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने दोन-तीन दिवस जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पेरणीची धांदल उडाली. या कामासाठी वेळेला मनुष्यबळ उपलब्ध होणे अडचणीचे असते. पण, यंदा पुणे-मुंबईकरांचा हातभार लागला. त्यांनीही मोठ्या हौसेने ही शेतातील कामे केली आहेत.
पुन्हा मुंबईला न जाण्याचा निर्णय
गेल्या दहा-बारा वर्षांपासून नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होतो. मार्चमध्येच कोरोना आला. त्यामुळे गाव गाठले. आता पुन्हा मुंबईला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ध्या हिस्स्याने शेती कसायला घेतली आहे.
- गावी स्थायिक होणारा एक मुंबईकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.