...अखेर आजरा तालुक्‍याच्या वैभवावर टाच ! 

रणजित कालेकर
गुरुवार, 28 मे 2020

आजरा तालुक्‍याच्या विकासाचा केंद्रबिंदू आजरा सहकारी साखर कारखाना अखेर जिल्हा बॅंकेच्या ताब्यात गेला. मंगळवार (ता. 26) बॅंकेने कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. तालुक्‍याच्या सहकारातील एका पर्वाची अखेर झाली. आर्थिक शिस्तीचा अभाव, व्यवस्थापन मंडळ व कामगारांत नसलेला समन्वय, बदलती सरकारी धोरणे यांमुळे या वैभवावर टाच आली असे म्हटले तरी कारखान्याच्या सत्तेसाठी झालेला संघर्षही कारणीभूत आहे. 

आजरा :  तालुक्‍याच्या विकासाचा केंद्रबिंदू आजरा सहकारी साखर कारखाना अखेर जिल्हा बॅंकेच्या ताब्यात गेला. मंगळवार (ता. 26) बॅंकेने कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. तालुक्‍याच्या सहकारातील एका पर्वाची अखेर झाली. आर्थिक शिस्तीचा अभाव, व्यवस्थापन मंडळ व कामगारांत नसलेला समन्वय, बदलती सरकारी धोरणे यांमुळे या वैभवावर टाच आली असे म्हटले तरी कारखान्याच्या सत्तेसाठी झालेला संघर्षही कारणीभूत आहे. 

125 कोटीची परतफेड प्रशासनाने वेळीच केली नसल्याने जिल्हा बॅंकेने ताबा घेतला. गडहिंग्लज उपविभागातील अखेरचा सहकारी कारखाना ठरला. यापूर्वी दौलत कारखाना बॅंकेने ताब्यात घेतला आहे. आजरा कारखान्याचा पहिला हंगाम 1997-98 ला झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्‌घाटन समारंभातील भाषणात कारखान्यात राजकारण आणू नका, असा सल्ला दिला होता; पण कारखान्यामध्ये अनेकदा राजकीय संघर्षच घडलाच आहे. उसाच्या उपलब्धेवर असलेली मर्यादा, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, साखरेचा अस्थिर दर, उपपदार्थनिर्मितीचा अभाव यामुळे आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आहेत.

निवडणुकीत सत्तेसाठी केवळ लोकानुनय करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी केला. कारखाना हा व्यवस्थापनाचा भाग असतो, याचे भान अखेरपर्यंत कोणाकडे नव्हते. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये 11-10 असे बलाबल झाले. सत्तेचा लोलक दोलायमान राहिला त्याचा परिणाम कारखान्याच्या कारभारावर झाला.

या काळात आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले. मध्यंतरी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी व विरोधकांच्यात समझोता घडवून आणण्याचा प्रयोग केला. दरम्यान, कामगार व व्यवस्थापनातही संघर्षाला सुरवात झाली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा ठराव झाला; पण कोणत्याही पार्टीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. बॅंकेचे हप्ते तटल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. 

पुढील हंगाम होणार का? 
वाढलेले उणे नेटवर्थ व तटलेले हप्ते यामुळे यंदा जिल्हा बॅंकेकडून कर्ज न मिळाल्यने हंगाम वाया गेला. जिल्हा बॅंकेकडे कारखाना गेल्याने पुढील हंगाम तरी होणार का? अशी विचारणा शेतकरी सभासदांतून होत आहे. 

यंदाचा हंगाम सुरू होण्यासाठी विनंती
कारखाना चालवण्यासाठी देण्यासाठी अनेक कंपन्यांच्या संपर्कात संचालक होते; पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यंदाचा हंगाम सुरू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कार्यवाही होण्याबाबत विनंती केली होती. बॅंक कारखाना टेंडर काढून चालवण्यास देणार आहे. 
- प्रा. सुनील शिंत्रे, अध्यक्ष आजरा साखर कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajara Karkhana In Possession District Bank Kolhapur Marathi News