"या' तालुक्‍यात कोरोना काळातही बचत गट चळवळीला गती, तब्बल 4 कोटी 32 लाखांचे प्रस्ताव सादर

रणजित कालेकर
Thursday, 10 September 2020

कोरोना काळातही आजरा तालुक्‍यात महिला बचत गट चळवळ गतिमान आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान'ला (उमेद) आजऱ्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आजरा : कोरोना काळातही आजरा तालुक्‍यात महिला बचत गट चळवळ गतिमान आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान'ला (उमेद) आजऱ्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत यंदा 191 बचत गटांनी बॅंकाकडे 4 कोटी 32 लाख रुपयांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी 69 बचत गटांचे प्रस्ताव मंजूर झाले असून 75 लाख 10 हजार इतकी रक्कम विविध बॅंकांतून बचत गटांना वाटप करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ही योजना 2014 पासून सुरू झाली. योजनेंतर्गत तालुक्‍यात 65 गावांत 651 बचत गट कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षात या योजनेंतर्गत अनेक गावांत महिलांचे 129 बचत गट स्थापन झाले असून यामध्ये भरच पडत आहे. महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण व्हावे. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, अशा उद्देशाने बचत गटाची चळवळ सुरू झाली.

यंदा उमेद योजनेंतर्गत तालुक्‍यात 318 बचत गटांनी 6 कोटी 11 लाखांचे उद्दिष्ट आहे. यापैकी 3 कोटी 32 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. कर्जाची रक्कम महिला गटांतर्गत गरजेसाठी व व्यवसायासाठी वापरावयाची आहे. बॅंकाच्या सकारात्मक धोरणामुळे या योजनेला तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी सभापती उदयराज पवार, उपसभापती वर्षा बागडी, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे. 

टप्प्यानुसार कर्जाचे स्वरूप 
उमेद योजनेंतर्गत गट स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या आत बचत गटांनी जमा केलेल्या रक्कमेच्या सहा पट किंवा एक लाख रुपये इतके पहिले कर्ज बॅंकांकडून गटाला दिले जाते. या कर्जाची परतफेड केल्यानंतर जमा रक्कमेच्या आठ पट किंवा जास्तीत जास्त दोन लाख गटाला कर्ज मिळते. अशा टप्प्यानुसार कर्जाचे स्वरूप असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक एस. टी. कराळे, पंचायत समिती आजराचे पी. एन. कांबळे यांनी सांगितले.
 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ajra Taluka, The Self-help Group Movement Gained Even During The Corona Period Kolhapur Marathi News