esakal | आठवडी बाजारात समुद्रातील नव्या माशांची आवक, वाचा कसे आहेत दर
sakal

बोलून बातमी शोधा

Arrival Of New Fish From The Sea At Gadhinglaj Market Kolhapur Marathi News

श्रावण महिन्यापाठोपाठ घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्याने मटण मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून समुद्रातील नव्या माशांची आवक सुरू झाल्याने ही बाब मांसाहारी खवय्यांच्या पथ्यावर पडली असून मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे.

आठवडी बाजारात समुद्रातील नव्या माशांची आवक, वाचा कसे आहेत दर

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : श्रावण महिन्यापाठोपाठ घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्याने मटण मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून समुद्रातील नव्या माशांची आवक सुरू झाल्याने ही बाब मांसाहारी खवय्यांच्या पथ्यावर पडली असून मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, टोमॅटोचा भाव वधारला आहे. आवक कमी असल्याने कांदा, लसूण यांचे दर तेजीत आहेत. फळ बाजारात सफरचंद, पेरू, डाळिंब यांची वाढलेली आवक टिकून आहे. 

मागणी लक्षात घेऊन कर्नाटकासह सांगली जिल्ह्यातून बकऱ्यांची खरेदी केल्याचे मटण विक्रेते अमर शेटके यांनी सांगितले. मटणाचा सहाशे रुपये किलो असा दर आहे. चिकन 160 रुपये किलो आहे. समुद्रातील माशांची आवक सुरू झाल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. सुरमई 800, पापलेट 700 ते 1000, झिंगा 500, रावस 600, धोंडी 300, हलवा 500, बांगडा 260, तसेच खेकडा 200 रुपये किलो आहे. कोथिंबिरीचा दर शंभर पेंढ्यांमागे 500 रुपयांनी कमी होऊन 1500 रुपयांवर स्थिरावला आहे. 

गेल्या आठवडाभरात कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. किलोमागे 5 ते 7 रुपये दर वाढला आहे. क्विंटलमागे 100 ते 200 रुपयांनी दर वाढून 1000 ते 1800 रुपये झाला आहे. 16 ते 25 रुपये किलो असा दर आहे. लसूणचा दरही वाढला आहे.

क्विंटलला 1 हजार ते 1200 रुपयांनी दर वाढला आहे. घाऊक 7 ते 12 हजार रुपये क्विंटल, तर किळकोळ बाजारात 100 ते 140 रुपये किलो असा दर आहे. कर्नाटकातील हसन बटाट्याचा 1500 ते 2800 रुपये क्विंटल असा दर आहे. टोमॅटो दहा किलोमागे 100 रुपयांनी वधारला असून 50 ते 60 रुपये किलो असा दर आहे. 

अंड्याचा दर वाढला 
फळभाज्यांचे दर सरासरी साठ रुपये किलो आहेत. त्यामुळेच अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, भाव वधारले आहेत. मागणीमुळे डझनाचा दर 60 रुपयांवर पोहचला आहे. शेकड्याला 100, तर डझनाला 12 ते 15 रुपयांनी दर वाढले आहेत. शेकडा 445 रुपये अंड्यांचा भाव झाल्याचे विक्रेते संभाजी शिवारे यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी