अनैतिक संबंधातून कोयत्याने केला हल्ला अन् कोंडले घरात  

पंडित कोंडेकर 
Wednesday, 2 December 2020

नागेश व संबधित तरुणी गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत

इचलकरंजी - अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून संशयितांनी तेथून पलायन केले. आसरानगर गल्ली नं.6 मध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. 

याप्रकरणी गावभाग पोलिसांनी राहूल विनोद पाथरवट (वय 19, रा. साईट नं. 102), नागेश शिवाप्पा हिरीकुरभूर उर्फ पुजारी (वय 21, रा.रायगड कॉलनी, पाटील मळा), संबधित तरुणी (वय 21, रा. आसरानगर) यांना अटक केली आहे. घटनेनंतर हे सर्वजण कर्नाटकात पसार झाले होते. जखमी नागेशला सांगली सिव्हील रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. 

याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी दिलेली माहिती अशी, नागेश व संबधित तरुणी यांच्यात गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच नागेशचे तिच्या घरी येणे-जाणे आहे. मंगळवारी रात्री नागेश हा तिच्या घरी गेला होता. तेथून बाहेर पडताना राहुल विनोद पाथवरट व त्याच्या मित्राने कोयत्यांने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्यात झटापटही झाली. 

यावेळी हल्लेखोरांनी कोयत्यांने नागेशच्या डोक्‍यात, हातावर, चेहऱ्यावर वर्मी घाव घातले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांनी नागेशला घरात कोंडले. त्यातनंर दरवाजास कडी कोयंडा लावून त्यांनी पलायन केले. सुमारे तासभर नागेश हा जखमी अवस्थेत खोलीतच पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

हे पण वाचातर मंगल कार्यालयांवर होणार फौजदारी ; गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर याद राखा

 

भागातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. गावभाग पोलिसांनी तातडीने जखमी नागेश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून हा हल्ला झाला आहे. 

हे पण वाचाप्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही ; शेतकऱ्यांचा निर्धार 

या प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी विविध पथके तत्काळ रवाना केली. तिन्ही संशयीतांना आज दुपारी पोलिसांनी पकडले. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक बाबुराव महामुनी, जयसिंगपूरचे पोलीस उपाधिक्षक रामेश्‍वर वैजंने यांनी घटनास्थळी भेट दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on man in kolhapur ichalkaranji