तिने पैसे देण्यास दिला नकार अन्

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

गोवळमध्ये प्रकार, महिला गंभीर जखमी

कणकवली (सिंधुदुर्ग) :  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार आज उघड झाला. त्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. हा प्रकार गोवळतिटा धनगरवाडी (ता. देवगड) येथे सोमवारी (ता.२६) सायंकाळी घडला. पोलिस ठाण्यात आज तक्रार नोंदवण्यात आली.

दीपाली दीपक जंगले (वय ३६ रा. गोवळ धनगरवाडी) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. त्यांनी आज येथील पोलिसांना जबाब दिला. त्यावरून तिचा पती दीपक लक्ष्मण जंगले (वय ४०) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा- जंगलावर अधिराज्य गाजविणारा बिबट्याची ओळख पटवतो ‘रोजेट पॅटर्न’ -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी  

गोवळ धनगरवाडी येथे जंगले कुटुंबीय राहतात. दीपकला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सायंकाळी त्याने दीपालीकडे दारूसाठी पैसे मागितले; मात्र तिने नकार दिला. या रागातून घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. यात ती ५० टक्के भाजली. हा प्रकार काही वेळानंतर तिच्या सासू-सासऱ्यांना कळाला. दीपाली यांना तत्काळ कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. आज त्यांची प्रकृती थोडीशी सुधारली. त्यामुळे पोलिसांनी जबाब नोंदविले. याप्रकरणी तपास देवगड पोलिसांकडे देण्यात आला आहे. पतीविरोधात जीवे मारणे, मानसिक छळ करणे, असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to burn wife alive for alcohol