बेळगावचा 'हा' धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा कर्दनकाळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

पर्यटनस्थळी सुरक्षेचा अभाव; पर्यटकांनीही घ्यावी खबरदारी

बेळगाव :  बेळगाव जिल्ह्याच्या आसपास अनेक पर्यटनस्थळे आहेत. सध्या पाऊस सुरुच असल्याने या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. मात्र, अनेक पर्यटनस्थळावर सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने पर्यटनस्थळे धोकादायक बनली आहेत. यामुळे पर्यटनस्थळी माहिती फलक लावण्याची मागणी होत आहे.

बेळगाव जिल्ह्यासह गोकाक, गोडचिनमलकी, सुंडी, राकसकोप, तिलारी, आंबोली, किटवाड आदी ठिाकणी पर्यटनस्थळे आहेत. ऑक्‍टोबर महिना सुरु असला, तरी परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पर्यटनस्थळावर ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बेळगाव शहराच्या आसपास चंदगड व बेळगाव तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्याकडे जाणाऱ्यांची संख्या सध्या वाढत आहे.

मात्र, याठिकाणचा धबधबा हा धोकादायक बनला आहे. सुरक्षेसंबंधी कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी नसल्याने अनेक पर्यटकांना आपला जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणचा विकास केल्यास किटवाड धबधबा हे पर्यटनस्थळ होऊ शकते. पंधरा दिवसांपूर्वी किटवाड येथील धबधब्याजवळ एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असून याचा पर्यटकांनीही विचार करणे गरजेचे आहे.
बेळगाव जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळावर यापूर्वी हुल्लडबाजी केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यंदाही किटवाडजळ एक दुर्घटना घडली आहे.

हेही वाचा- निमित्त पार्किंगचे  ; रुग्णालयात घुसून महिला डॉक्‍टरला पितळी घोडा फेकून केली मारहाण -

अशा घटना रोखण्यासाठी पर्यटकांसह पोलिस प्रशासनानेही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. अनेक पर्यटनस्थळे बेळगाव शहपासून अगदी जवळ आहेत. अशा पर्यटनस्थळावर रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. धबधब्याच्या ठिकाणी हौशी पर्यटक पोहण्यासाठी जातात. अशावेळी अनेकांना अतिउत्साह नडत असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 

किटवाड ग्रामस्थांना नाहक त्रास 
किटवाड धबधबा पाहण्यासाठी गावातूनच जावे लागते. याठिकाणी रोज ३ हजारहून अधिक पर्यटक भेट देत आहेत. गावातूनच जावे लागत असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण मद्यप्राशन करुन गाड्या चालवत असल्यामुळे याला ग्रामस्थ वैतागले आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum kitwad waterfall is becoming a time of amateur tourists