हाडे खिळखिळे करणाऱ्या रस्त्याचा इचलकरंजीत वाढदिवस

पंडित कोंडेकर
Saturday, 14 November 2020

वर्षभर नागरिकांचे हाडे खिळखिळी करणारा, वाहनांचे पार्ट सैल करणारा व अपघातांना आमंत्रण देणाऱ्या आमराई मळ्याकडे जाणाऱ्या खराब रस्त्याचा नागरिकांनी वाढदिवस केला.

इचलकरंजी : वर्षभर नागरिकांचे हाडे खिळखिळी करणारा, वाहनांचे पार्ट सैल करणारा व अपघातांना आमंत्रण देणाऱ्या आमराई मळ्याकडे जाणाऱ्या खराब रस्त्याचा नागरिकांनी वाढदिवस केला. एक वर्ष उलटले तरी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने आमराई मळा भागातील नागरिकांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करुन अपूर्ण रस्त्याचा निषेध केला. अपूर्ण रस्त्याचे काम झालेच पाहिजे अशा घोषणा देत रस्त्यावरच केक कापला आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना निषेधात्मक साखर वाटली. 

एकीकडे सर्व ठिकाणी दिवाळीचे आनंदपूर्ण वातावरण असताना मात्र दुसरीकडे वर्षभर खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेल्या आमराई मळा भागातील नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. नियोजनशून्य कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार केला. तक्रारी, वारंवार सूचना करूनही लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.

नोकरदार, शिक्षक, विद्यार्थ्यांसह या भागात शेतीक्षेत्र असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची वर्दळ नियमित असते. आता ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. पावसामुळे रस्ते करता येत नसल्याची परिस्थिती सर्वांना माहीत आहे, पण पावसाळा संपून दोन महिने संपत आले तरी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.

पालिकेच्या नियोजनशून्य कारभार समोर येत असल्याने खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे, अशा संतापाच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. आंदोलनावेळी मधुकर मुसळे, सचिन वरपे, उत्तम साळुंखे, राजेंद्र गुरव, सूरज येलाज, विजय पाटील, रोहित जाधव, ओम गुरव, मोहित कोळेकर, प्रल्हाद टिकारे आदी उपस्थित होते. 

धूळखात साहित्याला हारतुऱ्यांनी सजवले 
एक वर्ष उलटले रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्ते कामासाठी आणलेले डांबर बॉयलर मशीन रस्त्यावरच वर्षभर धूळ खात पडून आहे. या मशीनला हारतुऱ्यांनी सजवून रखडलेल्या कामाचा निषेध केला. गांधीगिरी मार्गाने अनोख्या पद्धतीने खराब रस्त्यांबाबत रोष व्यक्त करत नागरिकांनी नगरपालिकेला जागे केले.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Birthday Of The Pothole Was Celebrated In Ichalkaranji Kolhapur Marathi News