"गौरी'मुळे मिळाला गजऱ्याच्या बाजाराला बुस्ट, येथे झाली लाखोंची उलाढाल

ऋषीकेश राऊत
Wednesday, 26 August 2020

गौरी पूजनादिवशी सुवासिनींना विशेष महत्व असते. या पार्श्‍वभुमीवर शहरात गजऱ्याची तब्बल लाखोंची उलाढाल झाली. यामुळे गजऱ्याच्या बाजाराला जणू बुस्ट मिळाला आहे.

इचलकरंजी : गौरी पूजनादिवशी सुवासिनींना विशेष महत्व असते. या पार्श्‍वभुमीवर शहरात गजऱ्याची तब्बल लाखोंची उलाढाल झाली. यामुळे गजऱ्याच्या बाजाराला जणू बुस्ट मिळाला आहे. शिवाजी पुतळा चौकात गजरा सेंटरवर महिला वर्गाची झुंबड उडाली. यंदा इतर राज्यात एसटी सुरू नसल्याने गजऱ्यासाठी लागणारी फुले उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या.

कर्नाटकातून बेंगलोर भागातून मोठ्या प्रमाणात गजऱ्यासाठी लागणाऱ्या फुलांची आवक होते. यंदा विक्रेत्यांनी चिकोडी, निपाणीतून खासगी वाहतूकीतून फुले उपलब्ध झाली. जाई, जुई, मोगरा, काकडा, गुलाब, अबोली, मिक्‍स कणेरी, कोरंटी अशा नानाविध फुलातून येणाऱ्या सुवासाने शिवाजी पुतळा चौक दरवळला. 

गौरी पूजनाच्या पूर्व संध्येला आणि मंगळवार दुपारपर्यंत या ठिकाणी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. शहरातील शिवाजी पुतळ्यालगत असलेल्या गजरा सेंटरवर 10 ते 15 विक्रेते नेहमी गजऱ्याची विक्री करतात. दरवर्षी गौरीचा सण म्हणजे या विक्रेत्यांची पर्वणीच असते. गौरीच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसात मोठ्या प्रमाणात गजऱ्याची विक्री करतात. गजरा विक्रेते सहा महिन्यात जितकी उलाढाल करत नाहीत त्यापेक्षा अधिक उलाढाल या दोन दिवसात करतात. प्रत्येक गजरा विक्रेत्याची दोन दिवसातील गजऱ्याची विक्री 50 हजाराच्या घरात असते. 

गजऱ्याची सर्वाधिक उलाढाल
गौरीनिमित्त गजऱ्याला मोठी मागणी असते. संपूर्ण वर्षातील सर्वात जास्त गौरीला गजऱ्याची सर्वाधिक उलाढाल होते. त्यामुळे गौरीच्या दोन दिवस आधीच विविध फुलांचे गजरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. 
- अरविंद आवळे, गजरा विक्रेते

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boost To The Flower Market In Ichalkaranji Kolhapur Marathi News