त्याने १४ वर्षे दिली झुंज, तो म्हणायचा मी दहावी पास होणारच... पण नियतीला ते मान्य नव्हतं अन् शेवटी...

boy in Nipani died because of thalassemia
boy in Nipani died because of thalassemia

निपाणी - मी दहावी पास होणारच, तेही चांगल्या गुणवत्तेने ही त्याची महत्त्वाकांक्षा नियतीला मान्य नव्हती. म्हणूनच मृत्यूच्या दाढेत त्याला ओढून सर्वांच्याच मनाला चटका लावला. अक्कोळ (ता. निपाणी) येथील ओंकार बाळू घस्ते (वय १६) हे त्याचे नाव. जेमतेम सोळा वर्षांच्या आपल्या आयुष्यातील १४ वर्षे दुखण्यातून त्याला जगावे लागले. अवघ्या दोन वर्षांच्या वयापासून 'थॅलेसेमिया' या आजाराने त्याला गाठले आणि या आजाराशी झुंज देत ओंकारने आपले आयुष्य पणाला लावले. पण त्याची झुंज अखेर अयशस्वी ठरली. चारच दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले आणि सारा गाव हळहळला. त्याचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेला.

दोन वर्षांच्या ओकारला थॅलेसेमियाने गाठले आहे, हे लक्षात येताच गावातील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी त्याला निपाणीतील बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश कोरे यांच्याकडे अधिक तपासणी व उपचारासाठी पाठवले. त्यांनाही तेच निदान लागले. अठराविश्व दारिद्र्य असलेल्या ओकारच्या आई वडिलांसमोर त्याच्या उपचाराच्या खर्चाचा प्रश्न आ वासून उभा राहिला. मात्र डॉ. पंतबाळेकुंद्री आणि डॉ. कोरे हे दोघे देवदूतांसारखे त्यांच्या मदतीला धावले. महिन्यातून किमान दोनवेळा रक्त चढवणे आणि औषधांचा खर्च त्यांनी निभावला. काही रक्तपेढ्यांनी रक्ताचे मूल्य आकारले नाही. शिवाय डॉक्टरांनीही सेवा खर्च घेतला नाही. सलग १४ वर्षे ही अविरत सेवा चालली. त्याला जगवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या माता-पिता बरोबरच डॉ. संजय पंतबाळेकुंद्री डॉ. महेश कोरे यांच्यासह संपूर्ण अक्कोळ गाव हळहळला.

जीवनाची परीक्षा अनुत्तीर्ण...

जीवघेण्या आजारांशी संघर्ष करत ओंकार जगत होता. त्याच्या निष्पाप स्वभावामुळे अनेकांचा त्याचा लळा लागला. बघता बघता तो दहावीपर्यंत शिकला. नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिली. मी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण होणार याचा त्याला आत्मविश्वास होता. पण परीक्षा झाली आणि त्याला न्यूमोनिया झाला. अशातच त्याला मधुमेहहीही होता. उपचारासाठी त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोनाच्या संघर्षात त्याच्यावरही उपचार सुरू होते. पण प्रतिसाद मिळाला नाही. चार दिवसापूर्वी त्याने जगाचा निरोप घेतला आणि जीवनाची परीक्षा तो अनुत्तीर्ण झाला. 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com