आरे येथील बंधाऱ्याला भगदाड

प्रतिनिधी
Friday, 5 June 2020

गेल्या वर्षभरात बंधाऱ्याला दोन वेळा भगदाड पडल्याने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

कसबा बीड  ः आरे (ता.करवीर,जि कोल्हापूर) येथील तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला आज सायंकाळी मोठे भगदाड पडल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या वर्षभरात बंधाऱ्याला दोन वेळा भगदाड पडल्याने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.हा बंधारा आरे व सावरवाडी गावांना जोडतो. येथून सडोली हळदी गावाकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे रस्त्यावरून नेहमी वाहतूक सुरू असते. रात्रीच्या वेळी हे भगदाड लक्षात येत नाही. नदी पाण्याने भरुन वाहत असल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे हे भगदाड ताबडतोब भरून घेणे गरजेचे आहे. 1965 ला हा बंधारा बांधला आहे. किरकोळ डागडूजी व्यतिरिक्त येथे बंधारा सुरक्षेसाठी कामच झालेले नाही. बंधाऱ्याला सतरा गाळे आहेत. यामधील ही बरेच दगड निखळले आहे.

बंधारा वाहतुकीच्या दृष्टीने व पाणी अडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वर्षभरात दोन वेळा भगदाड पडले आहे. पाटबंधारे विभागाने त्वरीत लक्ष घालून पावसाळ्यापुर्वी याची दुरूस्ती करावी. येथे अपघात होऊ शकतो. 
- अमर वरुटे, ग्रामपंचायत सदस्य आरे. 

हा बंधारा 1965 च्या आसपास बांधला असून फार जुना आहे. याची दुरुस्ती केली आहे. तरीही येथे गेली दोन वर्षे मोठी भगदाड पडत आहेत. त्याची त्वरित दुरूस्ती करू. 
- व्ही. व्ही. आंबोळे, शाखा अभियंता पाटबंधारे शाखा भाटणवाडी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bridge break at Aarey dam