वांग्याला आला सोन्याचा भाव : आहारातील महत्त्वाचा घटक होणार गायब

महादेव अहिर
Thursday, 22 October 2020

घाऊक बाजारात ओलांडला १३० रुपयांचा टप्पा
 

वाळवा (सांगली) :  सर्वसाधारणपणे घाऊक बाजारात ३०० ते ५०० रुपये प्रती दहा किलो असणारी वांगी आज तब्बल १३१० रुपयांच्या घरात पोहचली. वांगी दराच्या इतिहासात ही ऐतिहासिक वाढ मानली जाते. घाऊक बाजारातच १३० रुपयांचा टप्पा प्रती किलोला ओलांडल्यामुळे किरकोळ बाजारात वांगी दीडशे रुपयांहून अधिक दराने विकली जात आहेत.  

त्यामुळे सामान्य माणसांच्या आहारातील महत्त्वाचे घटक मानले जाणारी वांगी जवळपास गायबच झाली आहेत. तुलनेत उत्पादन घटल्यामुळे बेभरवशी पावसामुळे वांगी दराने उसळी घेतली आहे. त्या तुलनेत इतर पालेभाज्या प्रती दहा किलोला ४०० ते ६०० रुपयांच्या घरात िस्थर आहेत. कांद्याने मात्र ७५०० रुपये क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे घरासह हॉटेलमध्ये कांद्याचे अस्तित्व विरळ झाले आहे. सर्वसाधारणपणे वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, पावटा, कार्ले, गाजर, मुळा, ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरचीचा वापर प्रत्येक ठिकाणी स्वयंपागृहात होतो.

त्यात वांग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाय त्याचा दरही परवडणारा असल्यामुळे सामान्य कुटुंबाला भाजीसाठी वांग्याचा मोठा आधार राहतो, मात्र हीच वांगी आता प्रती किलोला किरकोळ बाजारात २०० रुपयांकडे वाटचाल करीत आहेत. हिरव्या, काळ्या आणि पारवी रंगाच्या वांग्याच्या जाती या भागात प्रसिद्ध आहेत. त्यातही हिरवा काटा आणि तत्सम जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सर्वसाधारण लावणीनंतर आठ ते नऊ महिने वांगी उत्पन्न देतात. साधारणपणे प्रती दहा किलोचा दर २०० पासून जास्तीत जास्त ४५० रुपयांच्या घरात खेळता राहतो. गेल्या आठ दिवसांत मात्र वांग्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

हेही वाचा- सांगलीत यंदा गळीत हंगामासाठी एक लाख अकरा हजार हेक्टर ऊस उपलब्ध -

आवक कमी असल्यामुळे दरातील वाढीची गती काही कमी होत नाही. दोन दिवसापुर्वी घाऊक बाजारात वांगी ७०० ते ९०० रुपये प्रती दहा किलो मिळत होती. या दोन दिवसात मात्र वांगी दरात कमालीची वाढ झाली आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात जाऊनही प्रचंड दरामुळे वांगी खरेदी केली नाहीत. त्यामुळे कधी नव्हे ती वांगी टंचाई निर्माण झाली आहे. वांग्या बरोबरच कांदा दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. ७० ते ७५ रुपये प्रती किलो कांदा किरकोळ बाजारात मिळतो. त्यामुळे एकच कांदा दोन दिवस गृहिणी वापरत आहेत. बहुतेक ठिकाणी हॉटेलमध्ये कांद्याऐवजी इतर घटकांचा वापर वाढला आहे.

वांग्याचा दर भयंकर वाढल्यामुळे आम्ही वांगी खरेदीच केली नाहीत. १३०० रुपयाला १० किलो घेऊन वांगी किरकोळ ग्राहकांना कशी विकायची हा प्रश्‍न आहे. त्यामुळे वांगी खरेदी टाळतोच आहे.
- सचिन माळी, किरकोळ भाजी विक्रेते, वाळवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brinjal considered to be a historic increase in the history of eggplant rates