राज्य शासनाचा निर्णय ; हमीभावानुसार भात खरेदी होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

भात खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्ह्यानुसार दोन एजन्सीकडे ही जबाबदारी सोपविली आहे.

बेळगाव : चालू आर्थिक वर्षातील खरीप हंगामासाठी किमान हमीभावानुसार भात खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी राज्य सहकार महामंडळाला खरेदी एजन्सी म्हणून शासनाने नियुक्त केले आहे. त्यानुसार पुढील महिन्यापासून महामंडळाकडून भात खरेदी केले जाणार आहे.

भात खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्ह्यानुसार दोन एजन्सीकडे ही जबाबदारी सोपविली आहे. अन्न व नागरी पुरवठा खाते तसेच राज्य सहकार विक्री महामंडळ शासनाच्या आदेशानुसार भाताची किमान हमीभावाप्रमाणे खरेदी करणार आहे.  सहकार विक्री महामंडळ बेळगावातील भात खरेदी करतील. किमान हमीभावांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याकडून एकरी १६ क्विंटलप्रमाणे ४० क्विंटल भात खरेदी केले जाणार आहे.यासाठी पुढील महिन्यापासून शेतकऱ्यांची नावनोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत.

हेही वाचा- हद्द झाली ; आता सोने, चांदी नाही तर चक्क चोरट्याचा कांदा, बटाटावर डल्ला -

शासनाने १ लाख मेट्रीक टन अतिरीक्त भात किमान हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी मागितली आहे. भातासह तूर, सोयाबीन, शेंगा, जोंधळा, नाचणा, मका, बाजरीचीही किमान हमीभावाप्रमाणे खरेदी केली जाणार आहे. शेंगा आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने नुकतीच संमती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी केंद्र सरकारनेच किमान हमीभाव जाहीर केला आहे. निर्धारीत हमीभावानुसार भात खरेदीसाठी शासनाने ३०० कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. बेळगावसह गदग, हावेरी, धारवाड, चिक्कमगळूर, चामराजनगर, मंड्या, म्हैसूर या जिल्ह्यातही सहकार विक्री महामंडळाकडून भात खरेदी केली जाणार असून इतर जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा खाते भात खरेदी करणार आहे.  

प्रति क्‍विंटल हमीभाव
सामान्य भात    १,८६९
भात ग्रेड ए    १,९९९
तूर    ६,०००
सोयाबीन    ३,८८०
शेंगा    ५,२७५
हायब्रिड जोंधळा    २,६२०
जोंधळा    २,६४०
नाचणा    ३,२९५
मका    १,८५०
बाजरी    २,१५०

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy rice as per guarantee in belgaum