हिंदुंच्या यात्रोत्सवात मुस्लीम बांधवांचा संगीत साज

Celebrate The Music Of Muslim Brothers During Hindu Yatra Kolhapur Marathi News
Celebrate The Music Of Muslim Brothers During Hindu Yatra Kolhapur Marathi News

चंदगड : मंदिराबाहेर भाविकांची थट्ट गर्दी. दुपारी दोनच्या सुमारास मंदिराच्या गाभाऱ्यातून देवाचा जयघोष होतो. पालखीचे दर्शन आणि बाळकू गुरव डोकीवर आरती घेऊन मंदिरातून कधी बाहेर पडतात याकडे सर्वांच्या नजरा लागतात. शंख ध्वनीबरोबर ढोल-ताशाच्या टणत्काराने अवघा परिसर भारावून जातो. ढोल-ताशा वाजवणारे मुस्लीम बांधव आणि पालखी मिरवणुकीत मानकरी म्हणून बारा बलुतेदारांचा समावेश. हेरे (ता. चंदगड) येथील श्री देव रवळनाथाच्या वार्षिक यात्रोत्सवातील हे पारंपारीक चित्र. धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात जोपासली जाणारी ही परंपरा खूप काही शिकवून जाते. 

जातीय आणि धार्मिक मुद्यावरून आज अखेर विविध ठिकाणी दंगली घडल्या आहेत. संत, समाजसुधारकांनी जात-धर्मापेक्षा माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे आपल्या कृतीशील वागण्यातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने गावातील धार्मिक कार्यात सर्व जात, धर्मीयांना स्थान देण्याची पध्दत रुढ झाली असावी. हेरे येथील रवळनाथ हा पंचक्रोशीतील गुडवळे, खामदळे, सावर्डे, कोळींद्रे या गावांसह अन्य गावांचे श्रध्दास्थान.

देवाच्या मुख्य वार्षिक यात्रोत्सवात सर्व धर्मियांना सामावून घेण्याची परंपरा आहे. डोकीवर आरती घेणारा गुरव, वाद्य वाजवणारे मुस्लीम त्याशिवाय जहागिरदारांपासून ते हरीजन, पारसेकर, गोंधळी, सुतार आदी सर्वच जातीच्या मानकऱ्यांना पालखी मिरवणुकीत स्थान आहे. नव्या पिढीनेही ते मनापासून स्विकारले आहे.

गावात मुस्लिम समाज अत्यल्प आहे. परंतु पूर्वीपासून पालखी मिरवणुकीत ताशा वाजवण्याचे काम मुस्लिम समाजाकडे आहे. पूर्वी महमदसाब आगा हे नगारा वाजवायचे. आता त्यांचा मुलगा दस्तगीर आगा ताशा वाजवतात. रियाज सय्यद यांच्याकडे ढोलके वाजवण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे या कार्यातून त्यांना मंदिराकडून कोणतेही उत्पन्न नाही. केवळ परंपरा आणि देवावरील श्रध्दा म्हणून ते हे काम करतात. हा उत्सव म्हणजे जातीय आणि धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण आहे. 

परंपरा चालू रहाणे गरजेचे
रवळनाथाच्या यात्रोत्सवात ताशा वाजवण्याचा मान आमच्या कुटुंबाला मिळाला. वाडवडिलांनी जोपासलेली ही परंपरा मी चालवत आहे. देवावर माझी श्रध्दा आहे. सामाजिक सलोख्यासाठी यात्रेतील परंपरा अशीच पुढे चालू रहाणे गरजेचे वाटते. 
- दस्तगीर आगा, यात्रेतील ताशा वादक मानकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com