चंदगडला डोकीवरील आरतीला 84 खेड्यांतून गर्दी 

सुनील कोंडुसकर
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

चंदगड येथील ग्रामदैवत आणि परीसरातील 84 खेड्यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव रवळनाथाच्या वार्षिक यात्रोत्सवातील डोकीवरील आरती आणि पालखी मिरवणुकीचा विधी आज पारंपारीक पध्दतीने अमाप उत्साहात साजरा झाला.

चंदगड :येथील ग्रामदैवत आणि परीसरातील 84 खेड्यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव रवळनाथाच्या वार्षिक यात्रोत्सवातील डोकीवरील आरती आणि पालखी मिरवणुकीचा विधी आज पारंपारीक पध्दतीने अमाप उत्साहात साजरा झाला.

आरतीसाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह बेळगाव, गोवा, कोकण परीसरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. प्रदक्षिणेगणिक देवाचा जयघोष आणि पालखीवर चिरमुरे, लाडूची उधळण असा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा साजरा झाला. 

दुपारी एक वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरवात झाली. दोनच्या सुमारास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसह मानकऱ्यांनी मंदिरात हजेरी लावली. त्यानंतर आरती उचलण्यात आली. पालखीच्या पुढे डोकीवर आरती घेतलेले विलास गुरव, पारंपारिक पी-ढबाकचे वाद्य, मंदिर समितीचे सचिव मधुकर देसाई यांच्यासह शस्त्रधारी मानकरी आणि सासनकाठी मिरवत प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

प्रत्येक प्रदक्षिणेगणिक भाविकांनी पालखीवर लाडू चिरमुऱ्यांची उधळण केली. मंदिराचा परीसर तसेच गच्चीवर आणि समोरच्या विठ्ठल मंदिरावरील गच्चीवर उभारून भाविकांनी हा सोहळा अनुभवला. पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिर परीसरात लावलेल्या खाद्याच्या तसेच खेळण्यांच्या स्टॉल्सवरली गर्दीचे चित्र होते. 

रविवारी सोहळ्याची सांगता 
दरम्यान, मंदिराच्या पश्‍चिमेकडील बाजूला आवारात पाळणे व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सर्वत्र अमाप उत्साह आणि भक्तीमय वातावरण होते. शांततामय पध्दतीने हा सोहळा पार पडला. यापुढे चार दिवस पर्यंत विविध धार्मिक विधी केले जाणार असून रविवारी रात्री आरतीने सोहळ्याची सांगता होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Ravlnath Arthi Sohala Kolhapur Marathi News