घरात गणराज, शेतात गजराज...! "या' तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होतेय विचित्र कोंडी

सुनील कोंडुसकर
Tuesday, 25 August 2020

गेल्या आठवड्यात हेरे, खालसा गुडवळे, पार्ले, वाघोत्रे पासून माळी, न्हावेली, उमगाव, जांबरे या सुमारे दहा किलो मीटरच्या परिघात हत्तींचा वावर आहे.

चंदगड : चतुर्थीच्या सणाला प्रत्येकाच्या घरात गणराजाचे आगमन झाले आहे. तत्पूर्वीच शेतात गजराजांनी तळ ठोकला आहे. फटाक्‍यांची आतषबाजी करुन घरच्या गणेशाचे स्वागत तर शिवारात गजराजांना हुसकावण्यासाठी फटाके फुटत आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चीम भागात हे चित्र आहे. 

गेल्या आठवड्यात हेरे, खालसा गुडवळे, पार्ले, वाघोत्रे पासून माळी, न्हावेली, उमगाव, जांबरे या सुमारे दहा किलो मीटरच्या परिघात हत्तींचा वावर आहे. त्यांच्याकडून खाण्याबरोबरच पायाखाली सापडून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. पाऊस आणि दलदलीचे वातावरण असल्याने हत्तींचे पाय खोलवर रुततात.

बांधावरुन खाली उतरताना वजनाने बांध कोसळतात. कळप नुसता चालत गेला तरी झाडांचे, पिकांचे नुकसान होते. ऊस, केळी, नारळ, बांबू हे त्याचे खाद्य आहे. पश्‍चिम भाग कोकण सीमेवर असल्याने हे सर्व खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गेल्या आठ दिवसात विविध ठिकाणी हत्तीकडून सुमारे एक एकरातील पिके फस्त झाली आहेत. त्यात उसाचे सर्वाधिक, तर त्या पाठोपाठ भाताचे नुकसान झाले आहे. त्याचा बाजारभावाप्रमाणे लाखो रुपये दर होतो. 

कर्नाटकातील दांडेलीच्या जंगलातून आलेला हा कळप दोडामार्ग तालुक्‍यात स्थिरावला आहे. चंदगड व दोडामार्ग तालुक्‍याची सीमा संलग्न असल्याने दरवर्षी या दिवसात ते या भागात दाखल होतात. त्याचा पहिला फटका पोर्ले, खालसा गुडवळे व वाघोत्रेच्या शेतकऱ्यांना बसतो. कष्टाने लावलेली भात रोप तसेच उसाचे नुकसान होते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी, लोकप्रतिनिधी, संघटनांकडून होत आहे.

"वन विभागाकडून पंचनामे सुरू आहेत, पण शेतकरी अस्वस्थ आहेत.' आमच्याकडे गजराज आलेत. नुकसान केले, असे म्हणायचे नाही. चंदगडचा शेतकरी राजा आहे. तो हत्ती पाळतो.' अशा प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांच्या मनात खोलवर नुकसानीचा त्रागा आहे. कारण हत्तीनी उध्वस्त केलेले शेत पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात आहेत. या प्रश्‍नाची व्याप्ती पहाता सद्य स्थितीत बाजारभावाप्रमाणे भरपाई देणे हाच उपाय आहे. 

गेले आठवडाभर चार हत्तींचा कळप या भागात आहे. गेल्या पाच सहा वर्षापासून या दिवसात ते येतात. पिकांचे नुकसान करतात. माझे दोन गुंठयातील उसाचे व भाताचे नुकसान केले आहेत. ते पुन्हा येऊन आणखी नुकसान करू शकतात. आम्ही काय करायचे. 
- मारुती गावडे, वाघोत्रे 
 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chandgad Taluka Damage Of Agriculture By Elephant Kolhapur Marathi News