esakal | चंदगड तालुक्‍यात वाढतेय कोल्ह्यांची संख्या
sakal

बोलून बातमी शोधा

In Chandgad Taluka The Number Of Foxes Is Increasing Kolhapur Marathi News

सुरवातीच्या काळात गवे, त्यानंतर हत्ती, बिबट्या यासारख्या प्राण्यांचा त्रास येथे होता आता कोल्ह्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या सहा महिन्यात दोघांवर हल्ले झाले.

चंदगड तालुक्‍यात वाढतेय कोल्ह्यांची संख्या

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : कर्नाटक सीमेला जोडणारा चंदगड तालुक्‍याचा पूर्व भाग किणी-कर्यात म्हणून ओळखला जातो. या भागात जंगल नसतानाही गेल्या काही वर्षात कोल्ह्यांचा वावर वाढला आहे. "हमीभाव' या कारणामुळे या विभागात उसाचे पिक भरमसाठ वाढले आणि आता याच पिकामुळे कोल्ह्यांची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वीस वर्षात गवे, हत्ती, बिबट्यानंतर आता कोल्ह्याकडून शेतकऱ्याला उपद्रव सुरू आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेती ही डोंगरकपारीत वसलेली. कोकण सीमेवरील तो भाग अति पावसाचा आणि दूर्गम. परंतु पूर्व भागात काळीभोर सुपिक, सपाट जमिन, पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकात तण कमी. भात, भुईमूग, मका, इतर कडधान्यांचे भरघोस उत्पादन. कोणालाही हेवा वाटावा असा हा परिसर. चाळीस वर्षापूर्वी या विभागात दौलत साखर कारखाना सुरु झाला आणि शेतकऱ्याच्या जीवनात उसाने हरीतक्रांती आणली. हमीभाव, कमी कष्टात अधिक उत्पादन आणि नगदी पिक म्हणून सर्वसामान्य शेतकरी या पिकाकडे वळला. कौटुंबिक गरजेपुरती भात शेती करायची आणि उर्वरीत जागेत ऊस करायचा ही पध्दत बनली.

शेतकरी संघटनांमुळे उसाचा दर वाढत गेला. जागा मिळेल तिथे ऊस उभा राहिला. किणी-कर्यात भाग त्याला अपवाद नाही. हेमरस हा नवा कारखाना उभा राहिला यावरुन या विभागातील उसाची उपलब्धता लक्षात येते. सुरवातीच्या काळात गवे, त्यानंतर हत्ती, बिबट्या यासारख्या प्राण्यांचा त्रास येथे होता आता कोल्ह्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या सहा महिन्यात दोघांवर हल्ले झाले. ऊस हे कोल्ह्याचे आवडते खाद्य आहे. तो मिश्रहारी असल्याने नदीकाठची खेकडी, मासेसुध्दा खातो. इतर छोटी शिकार करतो. हे सर्व खाद्य त्याला या विभागात भरपूर असल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचा अंदाज आहे. 

उसाचे पिक मुबलक असल्याने संख्या वाढली
कोल्हा हा कुत्र्यासारखाच प्राणी आहे. तो चावला किंवा ओरबाडल्यास रेबीजसारखे अँटीबायोटीक्‍स वापरले जाते. किणी-कर्यात भागात जंगल नाही परंतु उसाचे मुबलक पिक असल्याने त्यांची संख्या वाढली असावी. 
- दत्ता पाटील, वनक्षेत्रपाल, पाटणे, चंदगड