
कोल्हापूर : तीन वर्षात ज्या पध्दतीने भाजपच्या पदाधिकारी आणि कारभाऱ्यांनी सत्ताधारी गटाच्या सदस्यांसह विरोधकांसोबत जो निधी वाटपाचा न्याय केला, त्याचीच परतफेड आता महाविकास आघाडीकडून सुरु झाली आहे.
यातूनच दलित वस्तीची 6 कोटी 50 लाखांची जनसुविधा-नागरीसुविधा कामातील 10 कोटी 50लाख, शिक्षण मधील 1 कोटी 50 लाख, पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीतील सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये, आरोग्यमधील 1 कोटींचा निधी कापून तो सत्ताधारी गटाच्या कारभारी, सदस्यांसह विरोधी गटाच्या सदस्यांना दिला आहे. अजूनही काही विभागांच्या यादीत फेरबदल करण्याचे काम सुरु आहे.
जिल्हा परिषदेची सत्ता मिळाल्यानंतर भाजप व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कारभाऱ्यांनी विरोधकांना भरडण्याचे काम केले. सत्ताधारी असतानाही अनेक सदस्यांनी विरोधकाची भूमिका घेतली. याचा सत्ताबदलात परिणाम झाला. भाजपची सत्ता पालटल्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांच्याच पावलावर पाउल टाकत निधीचा "करेक्ट' कार्यक्रम सुरु केला आहे. महाविकास आघाडीतील कारभारी असलेले उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, पक्षप्रतोद उमेश आपटे, राजेश पाटील, शशिकांत खोत आदींनी विभागनिहाय निधी वाटपाची माहिती घेत टेंडर न झालेली कामे रद्द करण्याचा सपाटा लावला आहे.
निधीचा मोठा वाटा महाविकासआघाडीकडे
कपात झालेला विविध विभागांचा निधी, ज्या सदस्यांना कमी निधी मिळाला किंवा अजिबात मिळाला नाही, अशा सदस्यांना वाटपाचे काम सुरु आहे. यात भाजप व जनसुराज्यच्या सदस्यांचाही समावेश आहे. देखभाल दुरुस्ती, नागरी व जनसुविधेच्या निधीतील मोठा वाटा मात्र महाविकास आघाडीच्या कारभाऱ्यांनी घेतला आहे.
सत्ता बदलूनही यांना लाभ
जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर निधीबाबत उलथापालथ सुरु आहे. पूर्वीच्या याद्या बदलून, भाजप सदस्यांना वगळून नवीन याद्या सुरु आहेत. मात्र हे करताना सर्वच भाजप सदस्यांना फटका बसला नसून उलट काही सदस्यांना फायदा झाला आहे.
यात भाजपचे प्रसाद खोबरे, स्मिता शेंडूरे, जनसुराज्यचे शंकर पाटील, मनिषा माने, शिवाजी मोरे आदींचा समावेश आहे. खोबरे यांना दलित वस्तीचे पूर्वी 25 लाख दिले होते. सत्ता बदलानंतर त्यांना 40 लाख तर शेंडूरे यांना 15 लाखाऐवजी 25 लाख रुपये दिले आहेत. पाटील, मोरे यांचाही निधी वाढवला आहे. तर माने यांना हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक निधी गेला असताना, शिक्षण सभापती यादव यांच्या आग्रहामुळे त्यांच्या निधीतील रुपयाही कपात केलेला नाही.
निधी कपातीचा दणका कोणाला?
निधी कपातीच्या प्रक्रियेत सर्वाधिक फटका बांधकाम समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना बसला आहे. दलित वस्तीतून त्यांनी 1 कोटी 40 लाखांचा निधी नेला होता. तर विरोधी सदस्य विजय बोरगे यांना 10 लाख व हंबीरराव पाटील व आकांक्षा पाटील यांना प्रत्येकी 5 लाख रुपये निधी दिला होता. सत्ता बदलानंतर निधी वाटपाची परतफेड सुरु आहे.
पदाधिकारी, कारभाऱ्यांना दणका
माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, विशांत महापुरे, विजय भोजे यांना फटका बसला असतानाच अरुण इंगवले, राहूल आवाडे, वंदना मगदूम यांच्या निधीला मात्र धक्का लागलेला नाही. त्यामुळे या निधी कापण्यामागचे राजकारण काय?, याची मात्र जिल्हा परिषदेत चर्चा सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.