क्वारंटाईन...छे !, हे तर मुंबईकरांचे घरच... 

अजित माद्याळे
शनिवार, 23 मे 2020

मुंबईकर म्हणजे गावची शान. गावच्या विकासात एक पाऊल पुढे टाकणारे मुंबईकर. या त्यांच्या गावावरील उपकाराची परतफेड करणे तसे अशक्‍यच. परंतु, कोरोनाने मुंबईकरांच्या या उपकारातून उतराई होण्याची संधी गावकऱ्यांना दिली अन्‌ संपूर्ण गाव एकजुटीने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले.

गडहिंग्लज : मुंबईकर म्हणजे गावची शान. गावच्या विकासात एक पाऊल पुढे टाकणारे मुंबईकर. या त्यांच्या गावावरील उपकाराची परतफेड करणे तसे अशक्‍यच. परंतु, कोरोनाने मुंबईकरांच्या या उपकारातून उतराई होण्याची संधी गावकऱ्यांना दिली अन्‌ संपूर्ण गाव एकजुटीने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) असे या गावचे नाव.

प्रचंड राजकीय ईर्षा असूनही क्वारंटाईन कक्षातील मुंबईकरांच्या मानसिक आधारासाठी सर्वपक्षीय प्रमुख आणि गावकरी हातात हात घालून पुढे आलेत. प्राथमिक शाळा, इंग्लिश स्कूल क्वारंटाईन कक्ष वाटतच नाहीत, तर मुंबईतल्या चाळीमधील आपले घरच असल्याचा अनुभव ते घेत आहेत. 

मुंबई, पुण्यावरून येणाऱ्यांमुळे कोरोना वाढला, अशी सर्वांचीच भावना आहे. यामुळे या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही काहीसा नकारात्मक झाला आहे; परंतु अनेक गावे अशी आहेत, की ती आपापल्या परीने या मुंबईकरांची सेवा करीत आहेत. त्यातील चन्नेकुप्पीचा आदर्श प्रेरणादायी आहे. हे चाकरमानी मुंबईतून सुटल्यापासून जन्मभूमीतील शाळेत येण्यापर्यंतची काळजी दक्षता समितीसह गावातल्या प्रत्येकाने घेतली.

येथे आल्यानंतर प्राथमिक शाळा आणि बी. आर. चव्हाण इंग्लिश स्कूलमधील क्वारंटाईन कक्षात केलेले नियोजन पाहून मुंबईकर भारावले. शाळेची प्रत्येक खोली, अंगण त्यांच्यासाठी स्वच्छ धुऊन तयार केलेली. क्वारंटाईन झाल्यानंतर त्यांच्या प्राथमिक गरजेसाठी रोज लागणाऱ्या साहित्याचे किट, मास्क, सॅनिटायझर प्रत्येकाला दिले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तीन शौचालये आणि तीन बाथरूम. सॅनिटायझरसह सोडियम हायपोक्‍लोराईड या निर्जंतुकीच्या औषधांचा पुरवठा केला.

क्वारंटाईन झालेल्या प्रत्येकाकडे एक लिटरची सॅनिटायझरची स्प्रे बाटली दिली. शौचालय, अंघोळीसाठी जाताना हे लोक बाटली घेऊन जातात. स्पर्श झालेल्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण ते स्वत:च करतात. आगपेटीपासून जेवणापर्यंतची सर्व सुविधा गावाने एकदिलाने केली आहे. विशेष म्हणजे सर्व क्वारंटाईन व्यक्तींना गावाने मोठा मानसिक आधार दिल्याने आरोग्याच्या दृष्टीने सर्व 53 लोक ठणठणीत आहेत. मनात कोणतीही शंका न ठेवता गावकरी मुंबईकरांची काळजी घेत आहेत. या गावात कितीही राजकीय संघर्ष असला तरी कोरोनाने या साऱ्यांना एका छताखाली आणण्याची सकारात्मक घटनाही घडली आहे, हे विशेष म्हणावे लागेल. 

मुंबईकरांसाठी काय पण... 
- सेंटर किचन सुविधा : या सेवेत चार महिला आहेत. महिलांना हॅण्ड ग्लोव्हज, डोक्‍याला टोपी. जेवणासाठी लागणारे सर्व साहित्य गावकऱ्यांच्या देणगीतून. चटणी-मिठापासून ज्वारी, गहूपर्यंतचे सर्व साहित्य यात आहे. दर बुधवारी अंडी आणि रविवारी चिकनचे जेवण दिले जाते. 

- वाडपी सेवा : गावातील सर्व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ही सेवा विभागून घेतली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगने जेवण वाटप. 
- करमणूक साधने : शाळेच्या व्हरांड्यात टी. व्ही. कनेक्‍शन दिले आहे. उष्णता जाणवू नये, यासाठी सर्व खोल्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था आहे. 
- सोशल मीडिया : क्वारंटाईन व्यक्तींचा व्हॉटस ग्रुप. त्यावर दक्षता समितीचे प्रमुख पदाधिकारी. कोणत्याही समस्या अगर काय हवे असेल, तर मुंबईकरांनी एक हाक द्यायची, सुविधा त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचते. 
- काळजी आरोग्याची : रोज सकाळी स्थानिक डॉक्‍टरांद्वारे थर्मल स्कॅनरद्वारे प्रत्येक व्यक्तीची ताप तपासणी. पिण्यासाठी गरम पाणी. गावातील कोणत्याही व्यक्तीचा मुंबईकरांशी संपर्क होऊ दिलेला नाही. ध्वनिक्षेपकाद्वारे क्वारंटाईन व्यक्तीचे नाव पुकारून घरातून आलेले साहित्य घेऊन जाण्यासाठी होमगार्ड देतात सूचना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Channekuppi Village Gives Best Service For Quarantine Mumbaikars Kolhapur Marathi News