
गडहिंग्लज : दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या गैरसमजाने खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरविल्याने दर निच्चांकी झाला होता. आता मात्र ही परिस्थिती पालटून गेली आहे. मागणी वाढल्याने चिकनचा दर पूर्व पदावर आला आहे. किलोला 180 रुपये असा दर झाला आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेले पोल्ट्री उद्योगाचे दुष्टचक्र आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
चिकनमुळे कोरोना होतो या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली. विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु या गैरसमजाच्या लाटेत पोल्ट्री उद्योग अक्षरशः उद्ध्वस्थ झाला. एक कोंबडी तयार होण्यासाठी किमान 70 रुपयांचा खर्च असताना दहा ते वीस रुपयांना कोंबडी विकण्याची वेळ पोल्ट्री उद्योजकांवर आली. काही पोल्ट्री धारकांनी तर आठवडा बाजारात फुकटच कोंबड्यांची विक्री केली. काहींनी खाद्य घालणे परवडणारे नसल्याने काळजावर दगड ठेवून या कोंबड्यांना मातीत पुरले. त्यामुळे पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांची संख्या रोडावली.
गेल्या आठवडाभरापासून मात्र लॉकडाऊनमुळे भाज्यांची आवक जेमतेम आहे. त्यामुळेच चिकनला मागणी वाढली. त्यातच बकऱ्यांचा तुटवडा असल्याने मटणाची तुरळक विक्री सुरू आहे. साहजिकच याचा परिणाम मागणीत वाढ करणारा ठरला. गेल्याच आठवड्यात 120 रुपये किलो या दराने विक्री सुरू होती. हळूहळू हा दर वाढत आता पूर्वीप्रमाणेच 180 रुपयावर स्थिरावला आहे. चिकनपासून विविध पदार्थ तयार करणारे सर्वच हॉटेल बंद असल्याने घरातच असे पदार्थ करण्यावर भर दिला जात आहे. अंड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. शेकडा सव्वा चारशे रुपये असा दर आहे.
दर आणखी वाढण्याची शक्यता
गेल्या पंधरवड्यापासून चिकनसाठी ग्राहक वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळेच दरही वधारले आहेत. सर्व कुटुंबच घरी असल्याने मटणाच्या तुलनेत कमी दर असणाऱ्या चिकनला अधिक पसंती आहे. तुलनेत उपलब्ध असणाऱ्या कोंबड्यांची संख्या कमी असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- संभाजी शिवारे, चिकन विक्रेते, गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.