धक्कादायक : कडेवरील बाळ पाहून पोलिसाने दिला स्वत;च्या जेवणाचा डबा; पण भामट्याने साधला वेगळाच डाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

तपासासाठी अकलूज पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे.

आजरा/श्रीपूर (जि. सोलापूर) : गोव्यातून लहान बाळ पळवून आणलेल्या एका व्यक्तीला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात दाखल करण्यात आले आहे. तपासासाठी अकलूज पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे. हणमंत बाबुराव डोंबाळे (वय 65, रा. शेळगांव, ता. इंदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

रविवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमाराला चेतन ईश्वर सोलंके (रा. विजयनगर कॉलनी, अकलूज) यांचा अकलूज पोलिसांना फोन आला. अकलूज येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोरील पत्राशेडमध्ये एक व्यक्ती लहान बाळासह थांबली आहे व त्याच्या हालचाली संशयास्पद आहेत, अशी माहिती सोलंके यांनी कॉन्सटेबल संदेश रोकडे यांना दिली.

महिला उपनिरीक्षक शिंदे, श्री. घाटगे, श्री. मोरे तातडीने घटनास्थळी पोहचले. तेथे डोंबाळे होता. त्याच्याकडे आठ-दहा महिन्याचे बाळ होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, माझे व पत्नीचे भांडण झाले आहे असून मी बाळाला घेऊन बाहेर पडलो आहे, असे त्याने सांगितले. त्याच्याकडे सासूरवाडीची चौकशी केली असता त्याने बारगांवमळा, एकशीव (ता. माळशिरस) येथील त्याच्या मेव्हण्याचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एकशिवचे पोलिस पाटील, सरपंच व संबंधित व्यक्तीच्या मेव्हण्याकडे चौकशी केली.

पोलिसांना त्यांच्याकडून अतिशय धक्कादायक माहिती मिळाली. तो गेल्या सोळा वर्षांपासून घरीच आलेला नाही. त्याच्या पत्नीला सांभाळत नाही. त्याचा मुलगा अठरा वर्षांचा असून मुलीचे लग्न झाल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर बाळ मडगांव (गोवा) येथून उचलल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सबंधित बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात दाखल केले आहे. गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे. 

हे पण वाचा - शिवाजी विद्यापीठाची बी. एड व एम. एडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या! काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य 

पोलिसाची मदत ठरली फोल 
गोव्यातून बाळ पळविणाऱ्या संबंधित व्यक्तीला आजरा तालुक्‍यातील एका चेकपोस्टवर एका पोलिसाने माणुसकीच्या भावनेतून पुढील प्रवासासाठी मदत केली होती. संबंधित व्यक्तीने अगदी काकुळतीने येवून मदत मागितली होती. त्याच्या कडेवरील बाळ पाहून संबंधित पोलिसाने त्याला पुढील प्रवासाची व्यवस्था करून दिली होती. त्याशिवाय स्वतःचा जेवणाचाही डबा त्याला दिला होता. 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child kidnapper arrested for akluj police