बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करत महिलांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

उदगावातील महिलांची फसवणूक; दोन वर्षे हुलकावणी

जयसिंगपूर (कोल्हापूर) :  बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करून उदगाव (ता. शिरोळ) येथील महिलांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीला जयसिंगपूर पोलिसांनी आज जेरबंद केले. शिवाजी तुकाराम ढमढेरे (वय ४६), मंदाराणी शिवाजी ढमढेरे (४३ दोघे पिंपळगाव जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

पिंपळगाव (जि. पुणे) येथील ढमढेरे दाम्पत्याने शिवजित सक्‍सेस नावाने बचत गट स्थापन करून महिलांकडून २०१६ ते २०१८ दरम्यान रक्कम व शेअर्स गोळा करून संस्थेच्या विविध खात्यांवर भरण्यास सांगितले होते. त्यानुसार उदगांव येथील महिलांनी ३३ लाख ११ हजार ८०१ रुपये भरले होते. महिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बचत गटाकडून या दाम्पत्याचा शोध सुरू  होता. याबाबत वैशाली विनायक माने (उदगाव ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली होती.

हेही वाचा- राधानगरीतील तीन शेतकऱ्यांना ४१ लाखांचा दंड -

पुणे व जयसिंगपूर पोलिसांनी या बंटी-बबलीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज जयसिंगपूर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात 
घेऊन मुसक्‍या आवळल्या. येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collect money under the name of bachat Group fraud couple arrested