ऋषीकेशच्या जीवनाची आता सुरुवात झाली होती म्हणत वडीलांच्या भावनांचा फुटला बांध

अशोक तोरस्कर
Saturday, 14 November 2020

जवानास वीरमरण; मुलाच्या जाण्याने जोंधळे कुटुंबीय दुःखाच्या खाईत

उत्तूर :  वडिलांचे गावातील भैरीदेवासमोर औषध विक्रीचे दुकान... कर्तृत्ववान वडिलांना गावात प्रतिष्ठा... प्रतिष्ठेला साजेशी मुलाची धडाडी... आयुष्यात काही कमी नव्हतं... मात्र नियतीला हे मान्य नव्हतं... ऐन दिवाळीत कुटुंबासह ग्रामस्थांना दुःखाच्या खाईत लोटून मिसरूड फुटलेला गावचा जवान देशासाठी हुतात्मा झाला. ऋषीकेश जोंधळे असे त्याचे नाव. पाकिस्तानच्या सैनिकांशी लढताना त्याच्यावर काळाने झडप घातली; पण पाक सैनिकांचे मनसुबे उधळत त्याने देशासाठी बलिदान दिले.

ऋषीकेश डॉजबॉल खेळाडू. या खेळात त्याने प्रावीण्य मिळवले होते. राष्ट्रीयस्तरापर्यंत त्याने धडक मारली होती. लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची खूणगाठ त्याने बांधली होती. सैन्यात भरती होण्यापूर्वी तो मैदानात पडला आणि हाताला जखम झाली. सैन्यभरती तोंडावर आल्याने आपल्याला भरती होता येईल की नाही, याची रुखरुख त्याच्या मनाला लागून होती; मात्र यावरही त्याने जिद्दीने मात केली आणि तो सैन्यात 
भरती झाला.

लेकराची जिद्द पूर्ण झाल्याचा आनंद कुटुंबीयांना होता; मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात तो हुतात्मा झाला. आख्ख्या गावाच्या मदतीला धावणारे त्याचे वडील मुलाला मात्र मदत करू शकले नाहीत. देवाने ऋषीकेश हिरावून नेला आणि जोंधळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आयुष्यात पहाडाएवढे दुःखाचे घोट गिळण्याशिवाय आता कुटुंबासमोर पर्याय राहिला नाही. ऋषीकेशच्या आठवणींचा जागर आता कुटुंबाला कायम रुंजी घालत राहणार आहे.

हेही वाचा- भावा... फटाके वाजवाचे नाहीत तर फटाके खायचे!

आता कुठे सुरुवात होती...
‘‘माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला ही अभिमानाची गोष्ट आहे; मात्र त्याच्या जीवनाची आता कुठे सुरुवात झाली होती...’’ एवढे बोलून ऋषीकेशचे वडील रामचंद्र यांचा भावनांचा बांध फुटला. त्यांनी अश्रू गाळत आवंढा गिळला आणि उपस्थित असलेल्या सर्वांची मने हेलावून गेली.

दिवाळी करणार नाही
ऋषीकेश जोंधळे हुतात्मा झाल्याची बातमी गावात कळताच ग्रामस्थ सुन्न अवस्थेत आहेत. गावचा सुपुत्र हुतात्मा झाल्यानंतर गावात दीपावली सण साजरा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ग्रामस्थांनी आकाशकंदील लावू नयेत, फटाके फोडू नयेत, पणत्या लावू नयेत, अशी सूचना संस्कार वाहिनीवरून दिली.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commando rushikesh jondhale Kalvandali Bahirewadi in Ain Dipotsava