इचलकरंजीतील कचरा उठावसाठी औरंगाबदच्या कंपनीला ठेका

पंडित कोंडेकर
Wednesday, 21 October 2020

इचलकरंजी शहरातील कचरा उठाव व वाहतूक करण्याच्या वार्षिक कामाच्या 6 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी दिली.

इचलकरंजी : शहरातील कचरा उठाव व वाहतूक करण्याच्या वार्षिक कामाच्या 6 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी दिली. औरंगाबाद येथील आदर्श फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस कंपनीची ही निविदा आहे. अंदाज पत्रकीय रक्कमेपेक्षा तब्बल 14.40 टक्के कमी दराने या कंपनीने निविदा सादर केली होती. यामुळे पालिकेचे सुमारे एक कोटी रुपये वाचणार आहेत. 

शहरात यापूर्वी वेगवेगळ्या मक्तेदारांकडून कचरा उठाव व वाहतूक केली जात होती. त्यानंतर शहरातील या कामाचा मक्ता बीव्हीजी कंपनीला दिला होता. त्यानंतर आराध्या एंटरप्रायजेस या कंपनीकडे हा मक्ता होता. कंपनीची मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबतची निविदा काढली होती. यापूर्वी 5 कोटी 40 लाखांची वार्षिक निविदा काढली होती. मात्र विविध नविन तरतूदीमुळे 7 कोटी 48 लाखाचे अंदाजपत्रक तयार करुन त्याबाबत निविदा मागवल्या होत्या. 

याबाबत एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील तीन निविदा पात्र ठरल्या. यातील सर्वात कमी आदर्श फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस कंपनीच्या निविदेला आज पालिकेत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली. निविदा कमी दरांमध्ये प्राप्त झाल्यामुळे पालिकेने नियमानुसार 45 लाखांची बॅंक गॅरंटी मक्तेदार कंपनीकडून घेतली आहे. कंपनीने सोलापूर, केज, तळेगाव दाभाडे, लोणावळा आदी ठिकाणी कचरा उठाव व वाहतूकीची कामे केली असल्याची माहिती देण्यात आली. 

या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती गीता भोसले, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मनोज हिंगमीरे, किसन शिंदे, मदन झोरे उपस्थीत होते. 

वेस्टेज चिकनसाठी स्वतंत्र घंटागाडी 
शहरात सध्या विविध ठिकाणी चिकण व बिर्याणी विक्री सुरु असते. अशा ठिकाणी वस्टेज चिकन टाकण्यात येते. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढतो. त्यासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरु करण्यात येणार आहे. या शिवाय मांस विक्री करणाऱ्या ठिकाणच्या कचऱ्यासाठी यापुढे स्वतंत्र घंटागाडी फिरणार आहे. 

रिफ्युज कॉम्पॅक्‍टरची रक्कम वगळली 
अंदाजपत्रकात पाच रिफ्युज कॉम्पॅक्‍टर पुरवण्याची तरतूद आहे. पण पालिकेकडे दोनच रिफ्युज कॉम्पॅक्‍टर आहेत. त्यामुळे तीन रिफ्युज कॉम्पॅक्‍टरची रक्कम 66 लाख 61 हजार रुपये रक्कम वगळली आहे. मक्तेदार कंपनीने स्वतः रिफ्युज कॉम्पॅक्‍टर पुरवल्यास त्याचा स्वतंत्र खर्च पालिकेकडून दिला जाणार आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract To Aurangabad Company For Garbage Collection In Ichalkaranji Kolhapur Marathi News