esakal | कोथिंबिरीचा दर घसरला, शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागेना
sakal

बोलून बातमी शोधा

Coriander Prices Fell Kolhapur Marathi News

आवक वाढल्याने येथील भाजी मंडईत कोथिंबिरीचा दर घसरला आहे. मिळणाऱ्या दरात वाहतूक खर्चही भागेना, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

कोथिंबिरीचा दर घसरला, शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागेना

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : आवक वाढल्याने येथील भाजी मंडईत कोथिंबिरीचा दर घसरला आहे. मिळणाऱ्या दरात वाहतूक खर्चही भागेना, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. मागणीमुळे पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. गेल्या रविवारी विक्रमी गर्दी अनुभवलेल्या आठवडा बाजारात दिवाळीमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या सोयाबीनचा दर टिकून आहे.

जनावरांच्या बाजारात तर केवळ म्हशींची 20 टक्केच आवक नोंदली गेली. गेला आठवडाभर तेजीत असणाऱ्या फळ बाजारात मागणीअभावी उलाढाल मंदावली होती. 
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्या आणि कोथिंबिरीचे कुजून मोठे नुकसान झाले. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दर वधारले होते. पाठोपाठ परतीचा पाऊसही अधिक झाल्याने कोथिंबिरीला उन्हाळ्याइतकाच चांगला भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

तसेच लावणीतील कोथिंबिरही मंडईत दाखल होऊ लागल्याने आवकेत लक्षणीय वाढ झाली. त्याचा परिणाम भाव घसरण्यावर झाला. शंभर पेंढ्यांचा महिन्याभरापूर्वीचा अडीच हजार हा दर 200 ते 300 रुपयांवर घसरला आहे. त्यामुळे कोथिंबीरची काढणी व बाजारात आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही सध्या मिळणाऱ्या दरात भागेनासा झाला आहे. त्यामुळे कोथिंबीर काढणेच बंद केल्याचे उत्पादक परशराम पाटील (रा. औरनाळ) यांनी सांगितले. 

पालेभाज्यांची दरात तेजी टिकून आहे. वांग्याला या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला. दहा किलोचा दर 200 रुपयांनी वाढून 700, तर किळकोळ बाजारात शंभर रुपये किलो असा दर आहे. इतर फळभाज्यांचे दरही कायम आहेत. गवार, भेंडीचेही दर जास्त आहेत. कडाडलेल्या कोबीचे दर दहा किलोमागे 150 रुपयांनी कमी झाले आहेत. दहा किलोचे दर असे ः टोमॅटो 300, ढब्बू 550, हिरवी मिरची 500, कोबी 250, फ्लॉवर 300, दोडका 500, भेंडी 600 रुपये. 

सोयाबीनचा दर टिकून आहे. क्विंटलला 4200 रुपये दर असून दिवाळीमुळे आवक तुरळक असल्याचे व्यापारी महादेव इंगळे यांनी सांगितले. फळ बाजारात गेल्या आठ दिवसांत लक्ष्मी पूजेसाठी मागणी वाढल्याने मोठी उलाढाल झाली; मात्र आज मागणी कमी झाल्याने विक्री घटल्याचे विक्रेते अमित रणदिवे यांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारातील जनावरांच्या बाजारातही म्हशींची सुमारे 30 आवक झाली. शेळ्या-मेंढ्या, बैलजोड्यांची एकही आवक झाली नाही. 

ग्राहकांची प्रतीक्षा 
गेल्या रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी कोरोनाचे सावट असतानाही विक्रमी गर्दी झाली होती. त्या दिवशी मोठी उलाढाल झाली. त्याची नेमकी उलट अवस्था आज पाहायला मिळाली. खास करून आठवडा बाजारातील भाजी विक्रेत्यांना तर ग्राहकांची प्रतीक्षा करत दिवस काढावा लागला. बाजारपेठेत केवळ कपडे खरेदीसाठी वर्दळ दिसली. 

संपादन - सचिन चराटी