असा असतो दख्खनच्या राजाच्या उत्सव पण यंदा मात्र डोंगर रिकामाच... 

केरबा उपाध्ये - जोतिबा डोंगर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील ज्योतिबा भक्तांना चैत्र महिना हा आनंदाची पर्वणी वाटते. पाडव्याच्या दिवशी गावोगावी सासन काठी उभा करून ज्योतिबाच्या यात्रेसाठी निघतात.

कोल्हापूर - दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा चैत्र यात्रा उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो. यादिवशी गुढी बरोबरच भाविक सासनकाठी उभा करतात. मुख्य मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग फल वाचन करून लिंब प्राशन केले जाते. सर्व विधी मोठ्या उत्साहाने सनई-चौघड्याच्या गजरात पूर्ण केले जातात आणि सर्वत्र आनंदी आनंद उत्साहाचे वातावरण सुरू होते. पण यावर्षी कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या आनंदाला विरझन लागले आणि चैत्र यात्रेचा उत्सवच रदद् करण्याची वेळ आली. 

महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील ज्योतिबा भक्तांना चैत्र महिना हा आनंदाची पर्वणी वाटते. पाडव्याच्या दिवशी गावोगावी सासन काठी उभा करून ज्योतिबाच्या यात्रेसाठी निघतात. चैत्र षष्टियुक्त सप्तमीला पुष्य नकक्षत्रावर ज्योतिबाचा आठ वर्षाच्या बालक रुपात जन्म झाला.  म्हणून यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन डोंगरावर केले जाते. यानंतर पौर्णिमेपर्यंत भक्त लोक डोंगरावर यायला सुरुवात होते. 

एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त सासनकाठी, ढोल-ताशे, हलगी, तुतारी यांच्या गजरात डोंगरावर दाखल होतात. मुख्य पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक होऊन आरती होते. ज्योतिबाची राजेशाही स्वरूपात पूजा बांधली जाते. दुपारी दोन वाजता सासनकाठी मिरवणुकीला सुरुवात होते. त्यावेळी लाखो भाविक चांगभलं'च्या गजरात सासन काठी नाचवतात आणि ही मिरवणूक यमाई मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होते.

वाचा - देवा तुझ्या डोंगरावर आम्ही यंदा पोहचायचं कसं ?

 चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी संपूर्ण डोंगर भक्तांनी खचाखच भरलेला असतो. वाहनतळावर वाहनांके प्रचंड ताफे पहायला मिळतात. सायंकाळ होताच भक्तांची पावले पालखी मार्गाकडे वळतात. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होते. तोफेच्या सलामीने महालदार-चोफदारांच्या आरोळीने दख्खनच्या राजा'ची पालखी यमाई मंदिराकडे निघते. पालखीच्या पुढे उंट,घोडे , वाजंत्री, मानकरी असा सर्व लवाजमा असतो. रस्त्याच्या दुतर्फा पालखी वरती गुलाल खोबऱ्याची उधळण करायला आतुर असलेले भक्त उत्सुकतेने उभे असतात. चांगभलेचा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळणीत पालखी सोहळा पुढे सरकत राहतो. पालखी सोहळा यमाई मंदिरात सहा वाजता पोहोचल्यानंतर याठिकाणी यमाई देवी म्हणजेच श्री रेणुका मातेचा अवतार आणि जमदग्नी ऋषी यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडतो. यावेळी जोतिबाची पालखी यमाई मंदिरासमोरील सदरेवर विराजमान असते. त्यानंतर यामाई देवीचा निरोप घेऊन पालखी सोहळा पुन्हा मुख्य मंदिराकडे जायला निघतो. भाविक देवाचे मनोभावे दर्शन घेऊन हा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवून आनंदाने उपवास सोडून आपल्या लाडक्या देवाचा निरोप घेतात. 

मात्र यावर्षी जोतिबा देवाचा वर्षातील मुख्य चैत्र यात्रेचा सोहळा रदद् झाला आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लोकडाउन असल्याने यावर्षी देशभरातील सर्वच धार्मिक उत्सव रद्द झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून ज्योतिबाची चैत्र यात्राही प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे . यामुळे वर्षभर यात्रेची लागून राहिलेली उत्सुकता पूर्ण होऊ शकत नाही याची सल सर्वच भाविकांमध्ये आहे. 

चैत्र यात्रा हा दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे जोतिबाच्या आशीर्वादाने कोरोनावर आपण विजय मिळवू आणि लवकरच देवाचा चुकलेला विजयोत्सव साजरा करू अशी भावना सर्व भक्त व्यक्त करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on jotiba yatra kolhapur