गर्भवती, नववधू सासरीच 'लॉकडाउन !' ; माहेराची लागली ओढ...

corona lockdown effect on pregnant and new married women
corona lockdown effect on pregnant and new married women

निपाणी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने अनेक सासुरवाशिणी माहेरापासून दुरावल्या आहेत. त्यामध्ये काही नववधूंचाही समावेश आहे. जानेवारी-फेब्रुवारीत विवाह झालेलींना माहेरची ओढ लागली आहे. तर गर्भवतींसमोर वेगळाच पेच असून त्याही सासरीच 'लॉकडाउन' झाल्या आहेत. सासुबाईच सुनबाईच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.

लग्नानंतर मुलीचे पहिले आपल्याकडे बाळंतपण माहेरी करण्याची परंपरा आहे. तर जावईबापूंना उन्हाळ्यात सासरी आंब्याच्या रसाचा पाहुणचार ठरलेला असतो. पण लॉकडाउनमुळे जावईबापूंचा हा पाहुणचार हुकला आहे. काही गर्भवती पुणे, मुंबई, सांगली, सातारासह इतर राज्यात सासरी अडकल्या आहेत. त्यामुळे आई-वडील मुलींना माहेरी कसे आणता येईल, या काळजीत आहेत. शासकीय परवानगी काढून खासगी वाहनाने अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून बायकोला माहेरी सोडताना नवऱ्याचीही चांगलीच दमछाक होत आहे.
नवजात बालकांच्या मातांनाही अनेक निर्बंधाखाली रहावे लागत आहे. नातेवाईकांच्या येण्या-जाण्यावरही बंधने आली आहेत.

बाळंतपण सुखरूप आणि सुलभ होण्यासाठी गरोदर महिलांना दररोज किमान एक किलोमीटर चालण्यास सांगितले जात आहे. परंतु घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांना व्यायाम करण्यास अडचण येत आहे. गरोदर महिलांना वरचेवर आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन जातानाही कुटुंबातील मंडळींची दमछाक होत आहे.
 

'लग्नानंतर पतीसमवेत नोकरीच्या ठिकाणी महाराष्ट्रातील खेड येथे वास्तव्यास आहे. गरोदर असल्याने माहेरी येऊन डॉक्टरांकडे नियमित उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र सद्य:स्थितीत लॉकडाउन असल्याने अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.'
- मयुरी चव्हाण,निपाणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com