
बेळगाव - बेळगाव शहरातील अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पीटलमध्ये कोरोना उपचार केंद्र अर्थात कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी (ता.18) महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यानी ईएसआय हॉस्पीटलला भेट देवून पाहणी केली. यावेळी भूदाखले विभागाचे सहसंचालक जगदीश रूगी त्यांच्यासोबत होते. ईएसआय हॉस्पीटलचे डॉक्टर व अधिकाऱ्यांशी यावेळी आयुक्त जगदीश यानी चर्चा केली. तेथे 25 खाटांचे उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक त्यासाठी तैनात केले जाणार आहे. असे झाल्यास बिम्समधील कोरोना उपचार केंद्रावरील ताण कमी होणार आहे.
त्यामुळे ईएसआय हॉस्पीटलची निवड...
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात सुरू झाल्यापासून बिम्स येथे एकमेव कोरोना उपचार केंद्र कार्यरत आहे. प्रारंभी कोरोना रूग्णांची संख्या कमी होती, त्यामुळे तेथे समस्या उद्भवली नाही. तेथे एकावेळी 250 रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे. पण गेल्या दोन आठवड्यात रूग्णांची संख्या वाढली आहे. गुरूवारी तर एकाचवेळी 150 रूग्ण उपचारासाठी बिम्समध्ये दाखल झाले. पण त्यांना दाखल करून घेणे अशक्य झाले. त्यामुळे तातडीने हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या वसतीगृहात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गुरूवारीच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र आदींनी तेथे भेट देवून पाहणी केली. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीतांना तेथे उपचार उपलब्ध करून देण्याचे निश्चित झाले. तेथे 80 खाटांचे उपचार केंद्र सुरू झाले आहे, आता केवळ तेथे रूग्ण दाखल करण्याची औपचारीकता शिल्लक आहे. एवढे करूनही पुन्हा खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ईएसआय हॉस्पीटलची निवड करण्यात आली आहे.
प्रारंभी ईएसआय हॉस्पीटल येथे क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात आले होते. हिरेबागेवाडी येथे जे कोरोनाबाधीत सापडले होते, त्यांच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील लोकाना तेथे ठेवण्यात आले होते. पण तेथे क्वारंटाईनमध्ये असतानाच अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे नंतर तेथील क्वारंटाईन केंद्र बंद करण्यात आले. पण आता मात्र तेथे कोरोना उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची वाढती संख्या पाहता भविष्यात आणखी काही ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू केले जाण्याची शक्यता आहे. खासगी रूग्णालयात उपचार केले जात आहेत, पण बाधीतांना शासकीय उपचार केंद्रातूनच उपचार घ्यावयाचे आहेत. त्यामुळे शासकीय उपचार केंद्रात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणखी कोठे उपचार केंद्र सुरू करणार हे पहावे लागणार आहे.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.