
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. त्यांची प्रभाग रचना व आरक्षण सोडत निघालेली आहे. स्थानिक नेत्यांकडून निवडणुकीसाठी आघाडी, उमेदवारांची चाचपणी सुरू होती. पण, या राजकीय घडामोडीनाही कोरोनाचा व्हायरस लागला आहे. निवडणुकीच्या प्राथमिक चर्चा थंडावल्याचे गावागावात दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील 76 सहकारी संस्थांच्या निवडणुकाही जूनच्या मध्यापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत म्हणजे गावची शिखर संस्था मानली जाते. सहाजिकच या शिखर संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी गावपातळीवर जोरदार रस्सीखेच होते. गावपातळीवरील नेत्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई मानली जाते. तर तालुकापातळीवरील नेत्यांकडून गावागावात आपला गट सक्षम करण्यासाठी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या जातात. गडहिंग्लज तालुक्यात 89 ग्रामपंचायती आहेत. यातील तब्बल 48 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत संपणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी जून महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. गावपातळीवरील नेत्यांकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आघाडीबाबत हालचाली सुरू होत्या. समविचारी पक्ष, गटांशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा सुरू होती. कोणाशी कसे जुळवून घ्यायचे, कोणत्या प्रभागातील जागा सोडायच्या याचे गणित मांडले जात होते. उमेदवारांच्या चाचपणीची प्रक्रियाही सुरू होती. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जीवन- मरणाचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे सहाजिकच निवडणुकीचा मुद्दाच बाजूला पडला आहे. राजकीय चर्चांची जागा आता कोरोना व्हायरसच्या चर्चेने घेतली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका 19 जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तालुक्यातील 76 सहकारी संस्थांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 65 विकास सेवा संस्था आहेत. सत्तेसाठी ग्रामपंचायतीनंतर अधिक महत्त्व विकास सेवा संस्थांना दिले जाते. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्यामुळे गावागावातील राजकीय वातावरणच थंडावले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका 19 जूनपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. पावसाळ्याचा अडथळा मानला नाही तर ग्रामपंचायत निवडणुकींसोबतच या संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
निवडणुका पुढे ढकललेल्या सहकारी संस्था...
- विकास सेवा संस्था....65
- पतसंस्था................. 7
- प्रक्रिया संस्था........... 2
- सहकारी बॅंका........... 1
- औद्योगिक संस्था....... 1
या ग्रामपंचायतींच्या निवडणुका...
ऐनापूर, अरळगुंडी, औरनाळ, बेळगुंदी, बुगडीकट्टी, चन्नेकुपी, चिंचेवाडी, दुगुनवाडी, दुंडगे, गिजवणे, हलकर्णी, हुनगिनहाळ, हेब्बाळ जलद्याळ, हेब्बाळ कसबा नूल, हिरलगे, हनिमनाळ, इदरगुच्ची, इंचनाळ, जांभूळवाडी, जरळी, कानडेवाडी, खणदाळ, लिंगनूर तर्फ नेसरी, लिंगनूर कसबा नूल, माद्याळ कसबा नूल, मनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, मुंगुरवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, नौकूड, निलजी, नूल, शेंद्री, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, सावतवाडी तर्फ नेसरी, तळेवाडी, तेगिनहाळ, तेरणी, तुप्पूरवाडी, उंबरवाडी, वडरगे, वाघराळी, हसुरचंपू, हरळी बुद्रूक, बसर्गे, चंदनकूड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.