कोरोनाबाबत समुपदेशन करणारे गरजेवेळीच कार्यमुक्त

अवधूत पाटील
Tuesday, 22 September 2020

समूह संसर्गामुळे कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. एक-एक गाव, प्रभाग कवेत घेताना कोरोनाने रुग्णांसह बाधित नसणाऱ्यांनाही मानसिकदृष्ट्या कमकुवत बनविले आहे.

गडहिंग्लज : समूह संसर्गामुळे कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. एक-एक गाव, प्रभाग कवेत घेताना कोरोनाने रुग्णांसह बाधित नसणाऱ्यांनाही मानसिकदृष्ट्या कमकुवत बनविले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना मानसिक आधाराची आवश्‍यकता आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसताना एप्रिल महिन्यात समुपदेशकांची नियुक्ती केली होती. पण, जेमतेम दोन महिन्यांतच त्यांना कार्यमुक्त केले. आता खरी गरज असताना समुपदेशक गायब आहेत. त्यामुळे रुग्णांना मानसिक आधार मिळणार कसा, हा प्रश्‍न आहे. 

कोरोना महामारीचे संकट आले. मार्च महिन्यापासून त्याचा प्रादुर्भाव वाढू लागला. पुण्या-मुंबईत सुरवातीला रुग्ण आढळले. त्यामुळे या ठिकाणी असणारे चाकरमानी गावी परतू लागले. त्यांना थेट घरी न पाठवता विलगीकरणाची व्यवस्था केली. आयुष्यात अचानक उद्‌भवलेल्या या आपत्तीमुळे मानसिक ताण निर्माण झाला. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी शासनाने समुपदेशकांची नियुक्ती केली. जिल्ह्यात 16 समुपदेशक कार्यरत होते. विलगीकरण केंद्रावर जाऊन ते समुपदेशन करीत होते. त्यांना एका महिन्याची नियुक्ती दिली होती. पण, या समुपदेशकांनी दोन महिने काम केले. त्यानंतर जबाबदारीतून मुक्त केले. 

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्याचा आकडा 39 हजारांच्या पार गेला आहे, तर एक हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रुग्णांचे आणि पर्यायाने बाधित नसणाऱ्यांचेही मानसिक खच्चीकरण केले आहे. आजाराविषयी मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. मृतांची संख्या वाढण्यासाठी ही भीती मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगताहेत. अशा आत्मविश्‍वास गमावलेल्यांना खऱ्या अर्थाने समुपदेशनाची गरज आहे. या समुपदेशनातून रुग्णांना नक्कीच मानसिक आधार मिळू शकतो. 

पण, नितांत गरज असताना समुपदेशक गायब आहेत. कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसताना शासनाला विलगीकरण केंद्रावर समुपदेशकांची नियुक्ती करावीशी वाटली. थेट सर्वोच्च न्यायालयानेही त्याची दखल घेतली होती. पण, सध्या रोज शेकड्यात रुग्ण सापडत असताना आणि मृतांची संख्या दोन आकडी होत असताना मानसिक आधार देण्यास कोणीच नसावे, हा विरोधाभास म्हणावा लागेल. 

मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आधार... 
शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथे कोविड केअर सेंटर आहे. या सेंटरमध्ये एक रुग्ण दाखल आहे. तो मानसिकदृष्ट्या खचला होता. मित्रांशी बोलत असताना ही बाब त्यांच्या समोर आली. त्यानंतर मित्रांनी संबंधिताला धीर दिला. शिवाय ओळखीतून एका मानसोपचार तज्ज्ञांचे त्याच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले. पण, नितांत गरज असताना असे मार्गदर्शन प्रत्येकालाच मिळेल असे नाही. त्यासाठी विलगीकरण केंद्रावर पूर्णवेळ समुपदेशकांची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counselors Are Not Available In Corona Centers Kolhapur Marathi News