
कोकटनूर येथील पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे अथणी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अथणी (बेळगाव) : कोकटनूर (ता. अथणी) येथील एका दांपत्याला झोपेत असतानाच पेटविले आहे. तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असून त्यात पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे. रेखा महादेव मादर (वय 45) व तिचा पती महादेव सीताराम मादर (वय 50) अशी मृत झालेल्या दांपत्याची नावे आहेत. ऐगळी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,
गुरूवारी (ता. 11) मध्यरात्री रेखा महादेव मादर व महादेव सीताराम मादर हे दांपत्य झोपेत असताना त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटविले. गंभीर जखमी अवस्थेते मादर दांपत्याला उपचारासाठी हुबळी येथील किम्स रूग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 12) पत्नी रेखा मादर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेव याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा काहीही फायदा न होता रविवारी (ता. 14) त्याचाही मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर महादेव याच्या पार्थिवावर कोकटनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकशीसाठी पाच संशयित ताब्यात
भाऊबंदकी व कौटुंबीक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाच संशयितांना ऐगळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासानंतर घटनेमागील सत्य उघडकीस येणार आहे. मयत मादर दांपत्याच्या मागे दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अथणी तालुक्यात भीतीचे वातावरण
कोकटनूर येथील पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे अथणी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण व सोशल मिडीयावर या घटनेची चर्चा करताना दिसत आहे.
संपादन- अर्चना बनगे