शाडूच्या मूर्तीची तिसऱ्या पिढीलाही भुरळ...वाचा गडहिंग्लजच्या युवा मूर्तिकारांची कलाकुसर

दीपक कुपन्नावर
Sunday, 26 July 2020

शाडूची गणेशमूर्ती घडविणे म्हणजे अधिक कसरत. प्लास्टरच्या तुलनेत चौपटीने वेळखाऊ काम. आर्थिकदृष्ट्याही न परवडणारे. साहजिकच शॉटकटसाठी प्रसिद्ध असणारी नवी पिढी यापासून चार हात लांब असणार असाच सर्वांचा समज आहे.

गडहिंग्लज : शाडूची गणेशमूर्ती घडविणे म्हणजे अधिक कसरत. प्लास्टरच्या तुलनेत चौपटीने वेळखाऊ काम. आर्थिकदृष्ट्याही न परवडणारे. साहजिकच शॉटकटसाठी प्रसिद्ध असणारी नवी पिढी यापासून चार हात लांब असणार असाच सर्वांचा समज आहे. परंतु, याला छेद देत पर्यावरणपूरक शाडू मूर्तीची कला टिकवण्यासाठी कुंभार समाजातील तिसरी पिढी सरसावली आहे. पारंपरिकतेपेक्षा नव्या उठावदार कलाकृतीसाठी त्यांची मेहनत लक्षवेधी ठरत आहे. 

येथील नदीवेस परिसरातील कुंभारवाड्यात सुमारे 50 कुटुंबे 5 हजारहून अधिक गणेशमूर्ती करतात. त्यातही पारंपरिक शाडूची मूर्ती करणारे हातावर मोजण्याइतपत कुटुंबे आहेत. दिवसाकाठी प्लास्टरच्या आठ ते दहा मूर्ती होतात, तर शाडूच्या एका मूर्तीसाठी दोन दिवस वेळ द्यावा लागतो. मात्र, इतके करूनही दोन्हींची किंमत सारखीच. त्यामुळे या न परवडणाऱ्या गणितामुळेच बहुतांशी मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्तीकडे पाठ फिरवली. त्यातच ग्राहकांचीही वजनाला हलकी म्हणून प्लास्टरला पसंती वाढल्याने शाडूमूर्तीकडे कल दिवसेंदिवस कमी झाला. किंबहुना, प्लास्टरमुळे गणेशमूर्तीचे काम कलेऐवजी उद्योगात रुपातंरित झाले. 

मोजक्‍या ज्येष्ठ ग्राहकांनी पारंपारिक शाडूच्या मूर्तीचा आग्रह कायम ठेवला. मागणी तसा पुरवठा म्हणून फायदा तोट्याचा विचार न करता नाईलाजाने काही मूर्तिकारांनी ही कला जपली. गेल्या दशकभरात पर्यावरणाबाबत जागृती वाढली. पाण्यात न विरघळणारे प्लास्टर, त्यासाठी वापरले जाणारे बाधक व्हार्निश रंग या सर्वामुळे होणारे नदीचे प्रदूषण चर्चेत आले. परिणामी, शाडूच्या मूर्तीला मागणी वाढू लागली. तसेच आपल्या आबा आजांपासून सुरू असलेली कला म्हणूनही नव्या पिढीतील काहीं युवा कलाकार शाडूमूर्तीकडे आकर्षित झाले. स्थानिकसह मुंबई, कर्नाटकातील शाडूचा वापर वाढला आहे. मूकबधिर विशाल अनिल कुभारही शाडूमूर्तीत रमला आहे. 

तिसऱ्या पिढीचे मूर्तिकार... 
श्रेयस किरण कुंभार, सर्वेश सुनील कुभार, सिद्धेश किरण कुंभार, कुणाल सुरेश कुंभार, राजेंद्र विष्णू कुंभार, अक्षय श्रीकांत कुंभार, शुभम श्रीकांत कुंभार, योगेश गजानन कुंभार, विशाल अनिल कुंभार. 

ग्राहकांनी वाजवी मोबदला द्यावा
इंटरनेटमुळे ग्राहकांची विविध रुपातील गणेशमूर्तीची मागणी वाढली आहे. शाडूतही प्लास्टर मूर्तीपेक्षा अधिक वैविध्य व जिवंतपणा आणता येऊ शकतो. त्यासाठी ग्राहकांनी वाजवी मोबदला द्यायला हवा. 
- श्रेयस किरण कुंभार, युवा मूर्तिकार, गडहिंग्लज

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Craftsmanship Of The Young Sculptors Of Gadhinglaj Kolhapur Marathi News