मध्यरात्रीचा अंदाज घेत तरुणाचा फिल्मीस्टाईलने केला पाठलाग अन्

अमृत वेताळ
Monday, 26 October 2020

वर्षभरापुर्वी शैबाज आणि पहिला संशयित बसवराज यांच्यामध्ये काकती येथे दुचाकीवरुन जाताना अंगावर चिखल उडाल्याने वादावादी झाली होती.

बेळगाव : पुर्ववैमनस्यातून तरुणाचा फिल्मीस्टाईलने थरारक पाठलाग करत कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला. शैबाज शेरखान पठाण (वय 24, रा. संगमेश्‍वरनगर) असे त्याचे नाव असून रविवार (ता.25) मध्यरात्री शिवबसवनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी सोमवार (ता.26) दोघा संशयिताना अटक केली असून बसवराज होळेप्पा दड्डी (वय 26), बसवणी सिध्दाप्पा नाईक (वय 27, दोघेही रा. मुत्यानट्टी) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी

वर्षभरापुर्वी शैबाज आणि पहिला संशयित बसवराज यांच्यामध्ये काकती येथे दुचाकीवरुन जाताना अंगावर चिखल उडाल्याने वादावादी झाली होती. त्यावेळी शैबाजने बसवराजवर चाकू हल्ला केला होता. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हांपासून बसवराजचा त्याच्यावर राग होता. तो अद्यापर्यंत योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्यामुळे त्याने शैबाजवर कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने पाळत ठेवली होती.

काल रात्री शैबाज हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन जात असताना वरील दोघा संशयितानी गॅंगवाडीनजिक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे शैबाज खाली कोसळला दोघानाही पाहताच त्याने जीव वाचविण्यासाठी पलायन केले. फिल्मीस्टाईलने पाठलाग करत असताना त्याने आपला बचाव करुन घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात शिवबसवनगरपर्यंत धाव घेतली आणि त्याठिकाणी निवृत्त पोलीस उपअधीक्षक पांडूरंग यलीगार यांच्या घरात शिरला. त्यामुळे संशयितानी त्याठिकाणी त्याच्यावर कोयत्याने सपासाप वार केले.

हेही वाचा- गुगल मॅपच्या साहाय्याने घरफोड्या करणारे जेरबंद -

शैबाज रक्‍ताच्या थारोळ्यात पडताच दोघांनीही घटनास्थळावरुन पलायन केले. किंचाळण्याचा आवाज येताच परिसरात नागरिक बाहेर आल्यानंतर घडला प्रकार उघडकीस आली. काहींनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री घडलेल्या या घटनेची माहिती शहरात पसरताच जिल्हा रुग्णालय आवारात मोठा जमाव जमला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमावाला पांगविले. पोलिसांनी  गुन्हा दाखल करुन तपासचक्रे गतीमान केली. आज वरील दोघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case ncident took place at Shivbaswanagar at midnight in belguam