फोन आल्यावर निशिकांत भेटायला गेला तो परत आलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

मृत अंजनेयनगरचा; मृतदेह आढळला गोकाक रोडवर

बेळगाव :  अंजनेयनगरमधील तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बेळगाव-गोकाक रोडवरील कबलापूर क्रॉसजवळ आज (ता. २६) सकाळी उघडकीस आली. निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय ३१) असे त्याचे नाव आहे. अज्ञात व्यक्तींनी कामानिमित्त निशिकांतला बुधवारी रात्री बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. आज सकाळी खून झाल्याचे उघडकीस आले. पण, खून कोणी व का केला त्याचा उलगडा झाला नाही.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की,

मूळचा महाराष्ट्रातील उदगीर (जि. लातूर) येथील निशिकांत बेळगावला खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून तो पत्नीसोबत येथे राहतो. बुधवारी नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यानंतर त्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी भेटण्यासाठी बोलविले. पण, त्यानंतर तो परतला नाही. मोबाईलही स्वीच ऑफ झाल्याचे आढळून आले.

रात्री उशिरापर्यंत निशिकांत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याची माहिती मिळू शकली नाही. गुरुवारी (ता. २६) सकाळी कबलापूर गावातील लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून व्यक्तीची ओळख पटविली. त्यावेळी ती व्यक्ती अंजनेयनगरमध्ये पत्नीसह तीन वर्षांपासून राहत असल्याचे चौकशीत पुढे आले. पण त्याची हत्या कोणी आणि का केली, याची माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून तपास हाती घेण्यात आला आहे पण रात्री उशिरापर्यंत धागेदोरे मिळाले नव्हते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसीपी (ग्रामीण) शिवारेड्डी, पोलिस निरीक्षक ए. एस. मंटूर व पोलिस उपनिरीक्षक एल. जी. करीगौडर आदींसह साहाय्यकांनी भेट दिली. 

हेही वाचा-रघुनाथदादा पाटील यांचे नेतृत्व; कर्नाटक व महाराष्ट्रात ‘जनप्रबोधन’ यात्रा -

खून एकीकडे मृतदेह दुसरीकडे?
मारेकऱ्यांनी गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. पण, कोणते हत्यार वापरले आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही. तसेच खुनाची घटना एकीकडे आणि मृतदेह कबलापूर क्रॉसजवळ आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच एकापेक्षा अधिक व्यक्तींनी मिळून खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime cases in belgaum