दुगूनवाडी ओढ्यात मगरीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

दुगूनवाडी येथील गावाशेजारी मासेवाडी-जांभूळवाडी रस्त्यालगतच्या ओढ्यामध्ये आज ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली असून ही माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने प्रत्यक्ष ओढ्याजवळ जावून पाहणी केली. 

दुगूनवाडी : येथील गावाशेजारी मासेवाडी-जांभूळवाडी रस्त्यालगतच्या ओढ्यामध्ये आज ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली असून ही माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने प्रत्यक्ष ओढ्याजवळ जावून पाहणी केली. 

गेल्या एक-दीड महिन्यापासून ओढ्याच्या परिसरात मगरीचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे पंधरा दिवसापासून काही नागरिकांनी मगरीच्या वावरवर पाळत ठेवली. त्यामध्ये आज प्रत्यक्ष ओढ्यातून ही मगर बाहेर येवून एका विहिरीत जात असल्याचे आढळून आले.

मगरीचा वावर असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच नागरिकांनी वनखात्याला याची माहिती दिली. त्यानुसार आज वनविभागाचे वनरक्षक आर. आर. नाईक व वनसेवक विलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु, ही मगर पाण्याने पूर्ण भरलेल्या दिनकर पाटील यांच्या विहिरीमध्ये गेली.

आता विहिरीतील पाणी उपसल्याशिवाय मगर पकडणे अशक्‍य असल्याचे वनखात्याने सांगितले. येथील ग्रामपंचायत व नागरीकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा करुन लवकरच मगरीला पकडले जाईल, असेही वनरक्षक श्री. नाईक यांनी सांगितले. गावकऱ्यांनी या विहिरीच्या परिसरात जावू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. 

बॅकवाटरमधून आली मगर? 
दुगूनवाडीचा हा ओढा ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या संगमाजवळ जावून मिळतो. या दोन्ही नद्यांचे पाणी कर्नाटकातील हिडकल जलाशयात जाते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने हिडकल जलाशय शंभर टक्के भरल्याने त्याच्या ओढ्यातून आलेल्या बॅकवाटरमधून ही मगर या भागात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile In Dugunwadi Valley Kolhapur Marathi News