बंदी कायम असतानाही चंदगडमधील "या' धबधब्यावर होतेय तोबा गर्दी, कारवाई करण्याची पोलिस यंत्रणेकडे मागणी

अशोक पाटील
Wednesday, 12 August 2020

खेडोपाडी कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना धबधब्याच्या नावाखाली वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या पर्यटकांमुळे ग्रामस्थांत भीती निर्माण झाली.

कोवाड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनस्थळांवरील बंदी अजून कायम असताना किटवाड (ता. चंदगड) येथील धबधब्याकडे मात्र पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. खेडोपाडी कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना धबधब्याच्या नावाखाली वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या पर्यटकांमुळे ग्रामस्थांत भीती निर्माण झाली. पोलिस यंत्रणेने तत्काळ यावर नियंत्रण आणावे, अन्यथा ग्रामस्थांनाच या प्रश्‍नासाठी पुढे यावे लागेल, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांची आहे. 

तालुक्‍याच्या पूर्वेला व कर्नाटक सीमेलगत उंच टेकडीवर किटवाड गावाची वस्ती आहे. गावच्या पूर्व व पश्‍चिमेला लघुपाटबंधारे धरण क्रमांक एक व दोन आहे. दोन्ही धरणे बारमाही भरलेली असतात. त्यातील पश्‍चिमेकडील धरण क्रमांक एकच्या सांडव्यातून किटवाड धबधबा निर्माण झाला आहे. सांडव्यावर लोखंडी पूल बांधण्यात आला.

पुलाच्या खालून जाणारे पाणी खोल दरीत कोसळते. त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत. तालुक्‍याच्या पर्यटन नकाशावर या धबधब्याची नोंद नसली तरी पर्यटकांना भुरळ घालणारे हे ठिकाण असल्याने येथे गर्दी होत आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे रोज येत आहेत. गावात चारचाकी व दुचाकी वाहने लावून पर्यटक धबधब्याकडे जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा याला विरोध आहे.

सांडव्याच्या वाहत्या पाण्यात अंघोळ करणे, बेधुंद होऊन नाच-गाणे करणे यासह मद्यप्राशन करणारे अतिउत्साही पर्यटक वाढले आहेत. कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या भागांतून लोक गावात येत असल्याने ग्रामस्थांत भीती आहे. सर्वच पर्यटनस्थळांवरून बंदी असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय
गेल्या 15 दिवसांपासून येथील धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी होत आहे. पोलिसांना याची माहिती दिली आहे, पण त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने याचा ग्रामस्थांना त्रास होतो. त्यासाठी ग्रामपंचायतीनेच पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- प्रा. के. एन. तेऊरवाडकर, सरपंच, किटवाड 
 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Crowd At The Waterfall In Chandgad Kolhapur Marathi News