३ मे नंतरच कर्नाटक बससेवेबाबत निर्णय...

विकास पाटील
Wednesday, 15 April 2020

कर्नाटक परिवहन महामंडळ : लाॅकडाऊनचा परिणाम

निपाणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन वाढल्यामुळे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ ३ मे नंतरच बससेवेबाबत निर्णय घेणार आहे. वातावरणाचा अंदाज घेऊनच बससेवा सुरु होणार आहे. चिक्कोडी विभागाच्या एका दिवसाला ३५० बसफेऱया रद्द झाल्याने १० लाखाचे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ३९ दिवसात चिक्को़डी परिवहन विभागाचे ३९० कोटीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आधीच तोट्यात चालणारे परिवहन महामंडळ आणखी तोट्यात येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. चिक्कोडी विभागात अथणी, रायबाग, गोकाक, संकेश्वर, चिक्कोडी, निपाणी या आगारांचा समावेश आहे. सहा आगारात ७०० बसेस असून १५०० हून अधिक चालक-वाहक, तांत्रिक व कार्यालयीन कमचारी आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले आहे.

३ मेनंतर बससेवा सुरु झाल्यास हे नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन महामहामंडळ प्रयत्न करणार आहे. मात्र प्रवाशांची संख्या रोडावल्यास पुन्हा महामंडळाला कसरत करावी लागणार आहे. तब्बल ३९ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाला नियोजन करावे लागणार आहे. दोन वर्षापासून सतत महामंडळाला बंदचा फटका बसत आला आहे.
परिणामी कर्मचाऱयांची पगार वाढ व बढतीही पुढे ढकलली आहे. या लॉकडाउनचा फटकाही कर्मचारयांना बसणार आहे.

`३ मे नंतरच वातावरणाचा अंदाज घेऊन वरिष्ठांनी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लाॅकडाऊन वाढल्यास बससेवा सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.`
- व्ही. एम. शशीधर,
विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision on Karnataka bus service only after seven may