esakal | आजरा तालुक्‍यातील "माधवगिरी' पर्यटनाच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Development Of "Madhavgiri" In Ajara Taluka Is Necessary In Terms Of Tourism Kolhapur Marathi News

आजरा तालुक्‍याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या तालुक्‍याच्या डोंगर दऱ्यात अनेक गोष्टी दडल्या आहेत. त्यापैकी इचलकरंजी संस्थानाची उन्हाळी राजधानी म्हणून एकोणीसाव्या शतकामध्ये प्रसिध्द असलेले "माधवगिरी' हे ठिकाण होय.

आजरा तालुक्‍यातील "माधवगिरी' पर्यटनाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या तालुक्‍याच्या डोंगर दऱ्यात अनेक गोष्टी दडल्या आहेत. त्यापैकी इचलकरंजी संस्थानाची उन्हाळी राजधानी म्हणून एकोणीसाव्या शतकामध्ये प्रसिध्द असलेले "माधवगिरी' हे ठिकाण होय. हे ठिकाण आजरा तालुक्‍याच्या पर्यटनाच्या नकाशावर येण्याची गरज आहे. कोकण व घाटमाथ्यामध्ये दुवा सांधणाऱ्या या ठिकाणाला समृध्द जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. त्याचबरोबर पर्यावरणीय व ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत. 

आजरा-आंबोली रस्त्यावर घाटकरवाडी नजीक हे ठिकाण आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ इचलकरंजीकर घोरपडे संस्थान व सावंतवाडी संस्थान यांच्यामध्ये आंबोलीबाबतचा राजकीय वाद निर्माण झाला. यातून झालेल्या राजकीय घडामोडीतून "माधवगीरी'ही इचलकरंजी संस्थानची उन्हाळी राजधानी म्हणून पुढे आली. संस्थानिक बाबासाहेब घोरपडे यांनी आजऱ्यापासून अठरा किलोमीटरवर घाटकरवाडी जवळील एका डोंगराला "माधवगीरी' हे नाव देवून राहण्याकरीता व राज्यकारभाराकरीता इमारती उभा केल्या.

या इमारतींचे अवशेष आज ही येथे पहावयास मिळतात. इचलकरंजीकर घोरपडे हे आजरा महालाचा कारभार येथून पहात असत. उन्हाळ्यात येथील हवामान 30 अंश सेल्सिअसच्या आत राहत असल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे हे उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण होते. या परिसराला ऐतिहासिक संदर्भही आहेत.

सीतेची आसवे, कंदील पुष्प, हाबे आम्री, किटक भक्ष्यी वनस्पती, अभाळी, निलीमा, सोनार्डी (स्मितीया व सोनकी) यासारखी विविध फुले आपले लक्ष वेधतात. भारंगी, भंगीरा, गुळवेल, शतावरी यासह विविध औषधी वनस्पतीचे आगर आहे. काळा बिबट्या, हत्ती, सांबर, बिबट्या, मोर, गवे यासह वन्यप्राण्यांची त्याचबरोबर टनेल स्पायडरसह असंख्य सुक्ष्य जीव, सरीसृपांचे येथे अस्तित्व आहे. शाश्‍वत पर्यटनाच्या दृष्टीने हे संवेदनशील ठिकाण आहे. 

जैवविविधता अभ्यास केंद्रासाठी संधी 
भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने घाटकरवाडीच्या ग्रामपंचायतीची संयुक्त वनव्यवस्थापन समिती व जैवविविधती समिती गठीत करून वनाचे संरक्षण करणे, दुर्मीळ वनौषधी, वनस्पती व फुलांची पठारे जतन व सवंर्धन यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिवाय त्या भागातील जैवविविधता टिकवून ठेवणे व त्यांची नोंद करणे आवश्‍यक असून जैवविविधतेचे अभ्यास केंद्र तयार करण्यासाठी संधी आहे.

संपादन - सचिन चराटी