मुख्याधिकारी मिळाले, आता लक्ष विकासाकडे

सुनील कोंडुसकर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

ब्रिटीश काळात सोयीचे ठिकाण म्हणून चंदगड गावाला तहसिलचा मान मिळाला. स्वातंत्र्यानंतर तो कायम राहिला. संपूर्ण तालुका एका बाजूला आणि तालुक्‍याचे गाव एका कोपऱ्यात अशी स्थिती असताना विकासाला मर्यादा आल्या. गेल्या दोन दशकात त्याला गती आली. काळानुरूप या गावाने कात टाकली. गतवर्षी येथे नगरपंचायत मंजूर झाली. लोकनियुक्त सदस्य मंडळ अस्तित्वात आले. प्रथम नगरअभियंता आणि नुकतेच मुख्याधिकारी रुजू झाले. गावाला शहराचे रूप मिळावे, अशी धारणा असलेल्या नागरीकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.

चंदगड : ब्रिटीश काळात सोयीचे ठिकाण म्हणून चंदगड गावाला तहसिलचा मान मिळाला. स्वातंत्र्यानंतर तो कायम राहिला. संपूर्ण तालुका एका बाजूला आणि तालुक्‍याचे गाव एका कोपऱ्यात अशी स्थिती असताना विकासाला मर्यादा आल्या. गेल्या दोन दशकात त्याला गती आली. काळानुरूप या गावाने कात टाकली. गतवर्षी येथे नगरपंचायत मंजूर झाली. लोकनियुक्त सदस्य मंडळ अस्तित्वात आले. प्रथम नगरअभियंता आणि नुकतेच मुख्याधिकारी रुजू झाले. गावाला शहराचे रूप मिळावे, अशी धारणा असलेल्या नागरीकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. शहराचा हा ग्रामीण तोंडवळा बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मातीच्या रद्याची, झावळ्या किंवा नळ्यांच्या खापऱ्यांचे छप्पर असलेली बसकी घरे, घराला लागूनच जनावरांचा गोठा, तिथेच शेती औजारे, धान्याची पोती रचलेली. खोपटात चालवली जाणारी हॉटेल्स. एका बाजूला चुलवान, धुराने डबडबलेल्या डोळ्यातून अश्रू गाळत मिसळ, चहाचा आस्वाद घेणारे ग्राहक. अंतर्गत कच्चे रस्ते. प्रचंड पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था. तालुक्‍याचे गाव असूनही तोंडवळा ग्रामीणच. मात्र गेल्या वीस वर्षात स्थानिकांचा आर्थिक स्तर उंचावत गेला. जीवनमानात त्याचे प्रतिबिंब दिसू लागले. आरसीसी इमारती उभ्या राहू लागल्या. हळूहळू गावाला शहराचे स्वरुप येऊ लागले. आपले गाव शहरासारखे दिसायला हवे असे वाटणाऱ्यांची संख्या वाढली. दहा वर्षापूर्वी हाच मुद्दा घेऊन अरुण पिळणकर यांनी ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. मात्र विकासासाठी ग्रामपंचायतीचा निधी कमी पडू लागला. ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून नगरपंचायतीला मंजूरी मिळवली. त्याला शहरवासीयांनी एकमुखी साथ दिली. आता लक्ष आहे ते शहराच्या विकासाकडे. 

शहराला बायपास रस्ता, वाहन पार्कींगची व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकर, स्वच्छता गृहे, विविध वसाहतींमधील स्वच्छता, सांडपाण्याची निर्गत, स्वच्छ पिण्याचे पाणी, वृध्दांसाठी करमणूक केंद्र, तरुणांसाठी व्यायामशाळा, आरोग्याच्या सुविधा आदी जिव्हाळ्याचे प्रश्‍न आहेत. त्यात सर्वात महत्वाचा प्रश्‍न आहे तो अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचा. अनेक वसाहतीमध्ये बांधकामे रस्त्यात आली आहेत. एका वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे. या कामाला नगरपंचायत कशी हात घालणार हा औत्सुक्‍याचा विषय आहे. 

वाहतुकीची सुलभता महत्वाची 
शहराची अपेक्षा ठेवत असताना वाहतुकीची सुलभता अत्यंत महत्वाची आहे. तो प्रश्‍न सोडवण्याची कसोटी आहे. नागरीकांनी त्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने स्वतःहून आपले अतिक्रमण हटवले, तर हे काम सोपे होणार आहे. नगरपंचायत त्यासाठी पुढाकार घेणार का हा खरा प्रश्‍न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devolopment Expectations In Chandgad Kolhapur Marathi News