esakal | चंदगडमधील धनगरवाड्यांना पायवाटेंचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Dhangarwada In Chandgad Has No Roads Kolhapur Marathi News

चंदगड तालुक्‍यात सुमारे 12 धनगरवाडे आहेत. सर्वच वस्त्या जंगलात असल्याने रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी लागते. त्यासाठी पाठपुरावा करण्याइतपत त्यांच्या समाजातून एखादे सक्षम नेतृत्व नसल्याने वर्षानुवर्षे दुर्लक्षच आहे.

चंदगडमधील धनगरवाड्यांना पायवाटेंचा आधार

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍यात सुमारे 12 धनगरवाडे आहेत. सर्वच वस्त्या जंगलात असल्याने रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी लागते. त्यासाठी पाठपुरावा करण्याइतपत त्यांच्या समाजातून एखादे सक्षम नेतृत्व नसल्याने वर्षानुवर्षे दुर्लक्षच आहे. रस्ता नसल्यामुळे पिढ्यानपिढ्या पायवाटेचाच आधार आहे. गावांपासून दूर जंगलात वस्ती असल्यामुळे दळप, कांडपापासून ते प्रत्येक वस्तुसाठी पायपीट करावी लागते. शिक्षण, आरोग्याच्या सेवा मिळवताना कष्ट पडतात. 

कर्नाटक आणि कोकणच्या सीमेवर वसलेला हा तालुका घनदाट जंगलाने आच्छादलेला आहे. दक्षिण दिशेला कर्नाटक सीमेवर तर पश्‍चिमेला कोकण सीमेवर सर्व धनगरवाडे वसलेले आहेत. वस्त्यासुध्दा दहा, पंधरा कुटुंबांच्या. त्यामुळे व्यावसायिक पध्दतीने काही सुविधा द्यायच्या म्हटल्या तरी परवडत नसल्याने एकाही वस्तीत साधे किराणा दुकान आढळत नाही. कर्नाटक सीमेवरील बांद्राई, बिदरमाळसारख्या वस्त्या तिलारीनगर या मोठ्या गावापासून सात-आठ किलोमीटरवर आहेत.

या वस्तींपासून हाकेच्या अंतरावर तिलारी जलविद्युत प्रकल्प आहे, परंतु गावात वीज पोहचण्यास स्वातंत्र्यानंतरही सुमारे साठ वर्षाचा काळ जावा लागला. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून या वस्तींवर विजेची जोडणी केली, परंतु प्रापंचिक गरजा भागवणाऱ्या सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत. काडेपेटी आणायची झाली तरी तिलारीनगरला यावे लागते. आजारीपणात तर खूप हाल होतात.

तिलारीनगर, हेरे किंवा चंदगडला यायचे झाल्यास थेट वस्तीतून वाहनांची सोय होत नाही. गंभीर आजारी रुग्णाला घोंगड्याचा पाळणा करून तिलारीनगरपर्यंत आणावे लागते. चौथीनंतर पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट ठरलेली. गवे, रानडुक्कर, बिबट्या, अस्वल यासारख्या श्‍वापदांचा जंगलात वावर असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. इतकी काळजी घेऊन मुलींना शाळेला पाठवण्यास पालक तयार होत नाहीत. त्यामुळे मुलींचे शिक्षण थांबते.

कानूर, काजीर्णे धनगरवाड्यांचीही काही प्रमाणात अशीच अवस्था आहे. हे वाडे मुख्य गावांपासून काहीसे जवळ असले तरी प्रत्येक गोष्ट या गावांवरच आधारित आहे. ऐतिहासिक कलानंदीगडाच्या पायथ्याला वसलेला कलिवडे धनगरवाडा मात्र गडाकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे जोडला गेला आहे, परंतु अजूनही हा रस्ता पक्का झालेला नाही. शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या धनगरांच्या मुलांनी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. त्यांच्या प्रगतीचा प्रवाह वाहता ठेवायचा असेल तर या वस्त्या पक्‍क्‍या रस्त्याने जोडणे गरजेचे आहे. 

चंदगडमधील धनगरवाडे 
बांद्राई, बिदरमाळ, नगरगाव, कानूर, काजीर्णे, तिलारी, कोदाळी, कळसगादे, कलिवडे, जंगमहट्टी म्हाळुंगे, बुझवडे.

संपादन - सचिन चराटी