जन्म दाखल्यांसंदर्भातील कागदपत्रे शोधताना कसरत

गणेश बुरुड
Wednesday, 7 October 2020

प्राथमिक शाळेत असणारे दाखल्यांसंदर्भातील दस्तावेज जीर्ण झाले असून काही ठिकाणी जुन्या दस्ताऐवजांना वाळवी लागली आहे. दस्तावेजांचे संगणकीकरण झाले नसल्याने कागदपत्रे शोधताना कसरत करावी लागत आहे.

महागाव : प्राथमिक शाळेत असणारे दाखल्यांसंदर्भातील दस्तावेज जीर्ण झाले असून काही ठिकाणी जुन्या दस्ताऐवजांना वाळवी लागली आहे. दस्तावेजांचे संगणकीकरण झाले नसल्याने कागदपत्रे शोधताना कसरत करावी लागत आहे. यासाठी हे सर्व जुन्या दस्ताऐवजांचे संगणकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अनेक प्राथमिक शाळांना शंभर वर्षाची परंपरा आहे. या शाळांनी अनेक विद्यार्थी घडविल्या आहेत. या शाळांमध्ये अनेक पिढ्यांचे दाखले रजिस्टरमध्ये जन्म तारखांच्या नोंदीसह कागदपत्रे उपलब्ध आहेत. गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. यापैकी आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत. परंतु त्यांच्या पाल्यांना आवश्‍यक दस्तावेज तयार करताना वडिलोपार्जित नोंदी असलेल्या रेकॉर्डची गरज असल्याने त्यांना गावातील प्राथमिक शाळेत धाव घ्यावी लागते. पन्नास किंवा साठ वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड शोधताना तासनतास वेळ घालावा लागतो. दस्तावेज जीर्ण होत असल्याने स्पष्ट नोंदी मिळताना अडचणी येत आहेत. 

जुन्या पिढीचे रेकॉर्डचे जतन करताना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याची बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळा शभंर वर्षांपासून आहेत. त्या शाळांमध्ये पूर्वी पासूनचा दस्तावेज रजिस्टरमध्ये आहे. या रजिस्टरची पाने फाटक्‍या अवस्थेत आहेत. जातीचे व अन्य प्रमाणपत्र तयार करताना पाल्यांना याच नोंदीची आवश्‍यकता असते. 

आज घडीला हे रेकॉर्ड दिसत असले तरी येत्या काही वर्षांत सदरचे रेकॉर्ड खराब होण्याची शक्‍यता आहे. ही वस्तुस्थिती आहे. यासाठी या कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याची गरज आहे. आतापर्यंत शासनाचे सर्वच विभाग संगणीकीकृत होत आहेत. परंतु जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मकता दिसत नाही. 

शाळा संगणीकृत पण... 
सद्यस्थितीत जवळपास सर्वच शाळा डिजिटल झालेल्या आहेत. परंतु जुने रेकॉर्डचे संगणकीकरण केलेले नाही. यामुळे रेकॉर्ड सांभाळताना मुख्याध्यापकांची धांदल उडत आहे. 

गडहिंग्लजला दहा शाळेत संगणकीकरण 
गडहिंग्लज तालुक्‍यातील 128 प्राथमिक शाळा पैकी दहा शाळेत दस्ताऐवजांचे संगणकीकरण झालेले आहे. अजून 90 टक्के म्हणजे 118 शाळांत संगणकीकरण झालेले नाही.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties in finding documents regarding birth certificates Kolhapur Marathi News