गडहिंग्लजला मुलींच्या वसतीगृहात असुविधा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

शेंद्री रोडवरील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह म्हणजे असुविधांचे आगर झाले आहे. विविध सुविधांपासून येथील मुली वंचित असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मनसेच्या पुढाकाराने वसतीगृहातील मुलींनी तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासमोर निवेदनाद्वारे आज आपल्या व्यथा मांडल्या.

गडहिंग्लज : शेंद्री रोडवरील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह म्हणजे असुविधांचे आगर झाले आहे. विविध सुविधांपासून येथील मुली वंचित असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मनसेच्या पुढाकाराने वसतीगृहातील मुलींनी तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासमोर निवेदनाद्वारे आज आपल्या व्यथा मांडल्या.

समस्यांच्या निराकरणासाठी येत्या सात दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवावी अशी मागणी निवेदनातून केली असून तसे न झाल्यास मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वसतीगृहात गृहपाल नाहीत. यामुळे मुलींची जबाबदारी घेण्यास कोणीच नाही. वसतीगृहातील समस्यांबाबत समाजकल्याण कार्यालयाला तक्रार केली तरी अद्याप कोणाचेही लक्ष नाही. वसतीगृहात बीव्हीजी कंपनीचे तीन सफाई कामगार आहेत. यातील एकीला ऑफीस कामासाठी ठेवले आहेत. एक कर्मचारी रात्र पाळीला असून केवळ एका कर्मचाऱ्यावरच वसतीगृहाची स्वच्छता सुरू आहे. यामुळे सफाई नियमित होत नाही. माळी कामासाठी असलेली कर्मचारी कामावरच नसते. झाडेझुडूपे वाढली असून सरपटणाऱ्या प्राण्यांची भिती आहे. 

आरोप आहे. तसेच पाण्याची टाकी तीन वर्षापूर्वी धुतली आहे. तीन वर्षापासून पालक सभाही घेतलेली नाही. अधिक्षिकांचा कारभार सफाईगार महिलाच पाहते. शैक्षणिक वर्ष संपले तरी मुलींना वसतीगृहातच ठेवून घेतले जाते. अनुत्तीर्ण मुलींना वसतीगृहात राहण्यास परवानगी दिली आहे. मेरिट लिस्ट जनरल बोर्डवर लावली जात नाही. वसतीगृहात संगणक कक्ष असूनही इंटरनेट नसल्याने दोन वर्षापासून हा कक्ष धूळखात पडला आहे. वसतीगृहातील मुलींना स्टेशनरीसाठी मिळणारे अनुदानही मुलींना मिळालेले नाही. निर्वाह भत्ता तर कधीच मिळत नाही. अधिक्षिकाच उपस्थित नसतात, यामुळे कर्मचारीही वेळेवर हजर नसतात. गरम पाण्यासाठी सोलर बसवूनही अद्याप त्याचा वापर नाही.

या सर्व प्रश्‍नावर तहसीलदार कार्यालयात समाजकल्याण अधिकाऱ्यांना बोलावून घेवून बैठक घ्यावी आणि समस्यांचे निराकरण करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही कार्यवाही आठवड्यात न झाल्यास मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशाराही श्री. चौगुले यांनी दिला आहे. नागेश चौगुले यांच्यासह हेमा यादगुडी, मृणाल हिरामणी, कल्पना झळके, प्रगती भुतल, सारिका पाटील, कावेरी झळके, सविता कळसगोंडा, राहूल व्हंजी, पुंडलिक कुराडे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Discomfort Of The Girls Hostel To Gadhinglaj Kolhapur Marathi News