खणदाळ प्रकरणातील चौकशीला विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदस्य झाले संतप्त

Dissatisfaction In Gadhinglaj Over The Management Of The Revenue Department Kolhapur Marathi News
Dissatisfaction In Gadhinglaj Over The Management Of The Revenue Department Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील पंचायत समितीची आजची मासिक सभा कधी नव्हे ती महसूल विभागाच्या कारभारावरुन गाजली. खणदाळ येथील धान्य वाटपातील भ्रष्टाचार, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्याच्या सभापतींच्या मागणीला उत्तर देण्याचीही न घेतलेली तसदी, तरतूद असूनही बचत भवनचे थकवलेले भाडे, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे केलेला कानाडोळा अशा एकापाठोपाठ एक बाबी सभागृहापुढे मांडत विद्याधर गुरबे यांनी महसूल विभागाच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खणदाळ प्रकरणातील दोषी आणि चौकशीला विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसण्याचा इशारा देण्यात आला. उपसभापती श्रीया कोणकेरी अध्यक्षस्थानी होत्या. 

पंचायत समिती सभा महिन्यातून एकदा होते, तरीही विभागप्रमुख सभेला दांडी मारतात. दरवेळी नवी व्यक्ती समोर उभा राहते. त्यांच्याकडे लोकांचे प्रश्‍न मांडायचे कसे, असा सवाल जयश्री तेली यांनी उपस्थित केला. गुरबे यांनी त्यांना पाठबळ देत यापुढे प्रत्येक बैठकीला कोणत्याही परिस्थितीत विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, अशी आग्रही मागणी केली. महसूल विभागाचे प्रतिनिधीही सभेला अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीतच महसूलच्या कारभाराचे वाभाडे काढायला सुरवात झाली. 
विद्याधर गुरबे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

खणदाळ येथे गोरगरिबांना वाटण्यास आलेले दोन टन धान्य परस्पर बाहेर काढले आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे तहसीलदारांना सादर केल्यानंतर चौकशी अधिकारी नेमल्याचे त्यांनी सांगितले; मात्र वीस दिवसांनंतरही काहीच झालेले नाही. त्यामुळे दोषींसह संबंधित अधिकाऱ्याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तरतूद असूनही बचत भवनचे 80 हजार रुपये भाडे दिलेले नाही. आपत्ती व्यवस्थापनात टीम म्हणून सर्व विभाग काम करीत असताना महसूल विभागाने परस्पर केवळ आपलाच व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

वाढीव वीज बिलाचा मुद्दा विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला. वीज बिलावर पूर्वीप्रमाणे मीटर रीडिंगचा फोटो प्रसिद्ध करण्याची मागणी कोणकेरी यांनी केली. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा ठराव झाला. कृषी संजीवनी सप्ताह फोटोपुरता केल्याचा आरोप कोणकेरी यांनी केला. ठराविक शेतकऱ्यांना घेऊन फोटो काढले जातात. बांधावर पोचल्यावर लोकप्रतिनिधींना निरोप दिला जात असल्याचा आरोप प्रकाश पाटील यांनी केला. हसूरचंपू रस्त्यावर दोन वेळा खर्च होऊनही खड्डेच असल्याकडे जयश्री तेली यांनी लक्ष वेधले. संस्थात्मक क्वारंटाईनबाबतही विठ्ठल पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला. 

कोविड काळात चांगले काम केल्याबद्दल तालुका व गावस्तरावरील सर्व कोविड योद्‌ध्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात गटविकास अधिकारी शरद मगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांचा लोकप्रतिनिधींतर्फे सत्कार झाला. वैद्यकीय टीम तयार करुन सर्व गावांतील दक्षता समितीच्या सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. विजय पाटील, इंदू नाईक, इराप्पा हसुरी आदी उपस्थित होते. 

सत्ताधारी-विरोधकांत समन्वय... 
पंचायत समितीची मागील सभा सत्ताधारी आणि विरोधकांतील खडाजंगीने गाजली होती; मात्र आजच्या सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांत चांगला समन्वय असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या बनश्री चौगुलेंनी मांडलेल्या ग्रामविकासमंत्र्यांच्या अभिनंदनाला भाजपच्या जयश्री तेली यांनी अनुमोदन दिले. वीज बिलासंदर्भातील श्रीया कोणकेरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचा तेली यांनी पाठपुरावा केला. उगवण न झालेल्या सोयाबीनचा मुद्दा भाजपचे विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला. त्यांना सौ. कोणकेरी यांनी सहकार्य केले. विभागप्रमुखांच्या उपस्थितीबाबत आग्रही असणाऱ्या सौ. तेली यांना विद्याधर गुरबे यांनी पाठबळ दिले. या समन्वयामुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न प्रशासनाकडे लावून धरल्याचे दिसून आले. 


संपादन ः सचिन चराटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com